लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रभाव विजयादशमी उत्सवावरही पडला आहे. कोरोनामुळे विजयादशमीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. संत्रानगरीत २० पेक्षा अधिक ठिकाणी रावण दहनाचे लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात कस्तूरचंद पार्क, समर्थनगर, राजाबाक्षा, रेशीमबाग, टिळकनगर, गणेशनगर आदी ठिकाणांचा समावेश आहे. सर्वात मोठा आणि लोकप्रिय कार्यक्रम सनातन धर्म युवक सभेच्या वतीने कस्तूरचंद पार्कवर आयोजित करण्यात येतो. संस्थेचे अध्यक्ष प्राणनाथ साहनी आणि महासचिव संजीव कपूर यांनी सांगितले की, शासनाच्या दिशानिर्देशानुसार दसरा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. यामुळे मागील ६८ वर्षांची परंपरा खंडित होणार आहे. कस्तूरचंद पार्कवर रावण, कुंभकर्ण व मेघनाथ यांच्या भव्य पुतळ्यांचे दहन करण्यात येत होते. सोबतच फटाक्यांची आतषबाजी आणि रंगारंग कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र राहत होते. विशेषत्वाने रामायणाच्या प्रसंगावर आधारित नाटिका सादर करण्यात येत होती. संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या सनातन समाचार या पत्रिकेच्या दसरा विशेषांकाचे प्रकाशनही रद्द करण्यात आले आहे.