नागपूर : उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांचे पाण्यामुळे हाल होऊ नये म्हणून त्यांना थेट डब्याच्या खिडकीजवळ जाऊन पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या स्वयं सहायता बचत गटाची अन् सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली आहे.उन्हाळ्यात सर्वच रेल्वेगाड्याच्या जनरल डब्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. रेल्वे स्थानक येताच ही मंडळी पिण्याचे पाणी घेण्यासाठी फलाटाच्या नळांवर गर्दी करतात. अशात काही नळांना पाणी नसने, धार बारिक असणे, असे प्रकार घडतात. तर, काही नळांना भरपूर पाणी असूनही एकाच वेळी प्रवाशांची पिण्याचे पाणी घेण्यासाठी झुंबड झाल्यामुळे आणि गाडीची वेळ झाल्यामुळे अनेकांना पाणी मिळत नाही. गाडी निघाल्याने हातात पाण्याची बाटली धरून ओल्या हाताने काही जण धावत्या गाडीच्या दाराचा दंडा पकडण्याचा प्रयत्न करतात. यात काही वेळा हात घसरतो आणि धोका होण्याची भीती असते.हे होऊ नये म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय वरिष्ठांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्व प्रथम फलाटावरील सर्वच्या सर्व नळांतून चांगले पाणी येईल, याची व्यवस्था करण्याचे आदेश सर्व रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. त्यासाठी नळाची दुरूस्ती करून घेणे, तोट्या बदलविणे, नळातून पाण्याचा प्रवाह चांगला राहिल, याची व्यवस्था करण्याचेही सांगण्यात आले आहे. या शिवाय प्रवाशांना थंड आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणच्या स्थानकांवर वॉटर कुलर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांनी फलाटावर उतरून नळासमोर गर्दी करण्याऐवजी त्यांना डब्याजवळच थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या स्वयं सहायता गटासोबत, सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली आहे.नागपूरसह सात स्थानकांवर व्यवस्थारेल्वे डब्याच्या खिडकीजवळ जाऊन प्रवाशांना पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नागपूरसह मध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर करण्यात आली आहे. त्यात नागपूर, सेवाग्राम, वर्धा, धामणगांव, चंद्रपूर, बैतूल आणि आमला या स्थानकांचा समावेश आहे. लवकरच अन्य काही स्थानकांवरही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली आहे.
फलाटांवर गर्दी करण्याची गरज नाही; प्रवाशांना बसल्याजागीच मिळणार थंडगार पाणी
By नरेश डोंगरे | Published: April 22, 2024 8:08 PM