दयानंद पाईकराव नागपूर नागपूर लोहमार्ग पोलीस मुख्यालयाचे कार्यक्षेत्र इगतपुरी पर्यंत विस्तारलेले आहे. यात विदर्भ मराठवाडा या भागांचा समावेश होतो. परंतु एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रातील रेल्वेतील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी लोहमार्ग पोलिसात एकही अधिकारी उरला नसून यामुळे रेल्वेगाड्यातील गुन्हेगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर बदली झालेल्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकांना ‘चार्ज’देण्यासाठी सुद्धा लोहमार्ग पोलिसात एकही अधिकारी नसल्याचे वास्तव आहे.नागपूर लोहमार्ग पोलीस मुख्यालयात लोहमार्ग पोलीस अधीक्षकाचे पद आहे. परंतु या कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने हे पद प्रभारी अधिकाऱ्याकडे देण्यात येत आहे.रवींद्र सिंघल यांच्या बदलीनंतर पहिल्यांदा हे पद वर्षभरापूर्वी पूर्णकालीन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना मिळाले. परंतु वर्षभरात पुन्हा त्यांच्या बदलीचा आदेश निघाल्यामुळे आता लोहमार्ग पोलिसात एकही अधिकारी उरला नाही. लोहमार्ग पोलीस मुख्यालयाचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे. त्यामुळे येथे पाच उपपोलीस अधीक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु त्यातील एकही उपपोलीस अधीक्षक नसल्यामुळे रेल्वेगाड्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कसा अंकुश लावावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच पोलीस उपअधीक्षकांची पदे भरल्यास त्या भागातील गुन्ह्यांवर अंकुश लावणे सोपे जाते. दोन दिवसांपूर्वी बदलीचा आदेश निघालेले लोहमार्ग पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पाच डीवायएसपी आणि दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक नसल्यामुळे काम करताना अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे रेल्वेगाड्यातील गुन्हे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरणे महत्त्वाचे आहे.
पोलीस अधीक्षकांना ‘चार्ज’ देण्यासाठी नाही अधिकारी
By admin | Published: May 16, 2015 2:35 AM