गोरेवाडा येथील खून प्रकरण नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा फिल्टर प्लांटसमोर झालेल्या एका खुनातील आणखी एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. मोहम्मद शकील मोहम्मद रफिक (२९) रा. मोठा ताजबाग , असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी याच खुनातील मुख्य सूत्रधार सोनू ऊर्फ जाबीर हुसेन अली मोहम्मद यासीन (२८) रा. जाफरनगर राजाराम सोसायटी याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. शकील हा जाबीरचा मामेभाऊ आहे. फिरोजखान हबीबखान (४१) रा. वनदेवीनगर, असे मृताचे नाव होते. जाबीर आणि शकील यांनी २५ आॅगस्ट २०१६ रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान फिरोजला जाफरनगर भागातील श्याम लॉनमागील रोज कॉलनी येथे भेटायला बोलावून त्याचा टॉवेलने गळा आवळून खून केला होता आणि मृतदेह गोरेवाडा येथे फेकून दिला होता. उप्पलवाडी येथील डॉली नावाच्या एका महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी २६ रोजी भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही २७ आॅगस्ट रोजी अटक केली होती. प्रकरण असे की, डॉलीची आई १५ वर्षांपासून फिरोजसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात असताना फिरोजने २०१२ मध्ये म्हाडा कॉलनी येथील मोना ऊर्फ नाझिया नाहीद परवीन (२५) सोबत निकाह केला होता. त्यांना तीन वर्षांची एक मुलगी आहे. आरोपी जाबीर हा मोना हिचा भाऊ आहे. मोना हिने जनलक्ष्मी बचत गटातून सहा जणांच्या नावे प्रत्येकी ३० हजाराचे कर्ज घेतले होते आणि १ लाख ८० हजार रुपये घेऊन ती घटनेच्या १५ दिवसांपासून बेपत्ता झाली होती. मोना आणि फिरोजमध्ये सतत भांडणे होत असल्याने सोनू आणि शकील यांनी फिरोजला संपवण्याची योजना आखली होती. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील दीपक गादेवार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
आणखी एकाचा जामीन फेटाळला
By admin | Published: March 20, 2017 2:07 AM