नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील ‘प्री टर्म बेबी युनिट’ (पीबीयू)मध्ये ३१ ऑगस्ट २०१९ रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत एका परिचारिकेच्या धाडसाने ९ नवजात बालकांचे प्राण वाचले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या ‘फायर ऑडिट’वर प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु याचा धडा रुग्णालय प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणीच घेतला नसल्याचे भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या घटनेवरून दिसून येत आहे.
‘पीबीयू’ कक्ष हा सहा खाटांचा असताना नऊ नवजात बालकांना ठेवण्यात आले होते. पाच बालकांची प्रकृती गंभीर होती. यातील तिघांना ऑक्सिजनवर तर दोघांना ‘वॉर्मर’वर ठेवण्यात आले होते. ३१ ऑगस्ट २०१९ रोजीच्या पहाटे २.४५ वाजताच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन धूर पसरून आग आगली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सविता ईखार या स्टाफ नर्सने तातडीने याची माहिती सुरक्षारक्षकांना दिली. परंतु त्यांना यायला व मदत पोहचण्यास उशीर होणार असल्याने आणि आग वाढत असल्याने परिचारिका ईखार यांनी धावाधाव करीत दोन हातात दोन बालके घेत सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले. त्यापूर्वी आग पसरू नये म्हणून तातडीने ऑक्सिजन आणि वॉर्मर बंद केले. या धाडसाने ९ बालकांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे, अशीच घटना १९९८ मध्ये घडली होती. बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागाला ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली होती. त्यावेळी विद्या चंद्रशेखर कावळे या परिचारिकेने कक्षातील सातही बाळांना आपल्या पदरात घेऊन सुरक्षित स्थळ गाठले होते. त्या परिचारिकेच्या हिमतीची दाद आजही दिली जाते.
-मेडिकलमध्ये नवजात बाळ जळाले होते
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘एनआयसीयू’ कक्षात ‘वॉर्मर’मध्ये ठेवलेल्या २७ दिवसांच्या बाळाचा जळून मृत्यू झाला होता. २००९ मध्ये या प्रकरणाचीही चौकशी करण्यात आली. परंतु कोणीच दोषी आढळून आले नाही.
-अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातही लागली होती आग
२२ एप्रिल २०१९ रोजी अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला अचानक आग लागल्याने नवजात बालकांचे प्राण धोक्यात आले होते. परंतु डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
-चिमुकले जळण्याच्या घटनेतून खासगी हॉस्पिटलही सुटले नाहीत
‘एनआयसीयू’मधील चिमुकल्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने चिमुकले जळण्याच्या घटनेतून खासगी रुग्णालयेही सुटलेली नाहीत. ८ जुलै २०१९ रोजी नागपूर येथील डॉ. कुश झुनझुनवाला यांच्या खासगी हॉस्पिटलमधील ‘एनआयसीयू’ मध्ये भरती असलेला ११ दिवसांच्या बाळाचा ‘फोटो थेरपी’ यंत्रात जळून मृत्यू झाला होता.