नागपूर : उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते. चाणक्य माणसे घडविताे पण फडणवीसांनी काेणती माणसे घडविली? त्यांना आपल्या पक्षात माणसे घडविता आली नाही. उलट बाळासाहेबांनी आणि पवारांनी घडविलेली माणसे फाेडून त्यांनी सरकार बनविले. अशी भाड्याची माणसे जमवून सरकार बनविल्याने कुणी चाणक्य हाेत नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या महाप्रबाेधन यात्रेचा दुसरा टप्पा गुरुवारी उपराजधानीतून सुरू करण्यात आला. यात उद्घाटन करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताेफ डागली. संघ, भाजपच्या ट्राेल आर्मीने काॅंग्रेसच्या नेहरू, गांधी ते राहुल गांधी आणि आता उद्धव ठाकरे यांच्या चारित्र्य मलिन करण्याचे काम चालविले आहे. याच भुंकणाऱ्या आर्मीकडून फडणवीस अभ्यासू आहेत, चाणक्य आहेत, अशी प्रतिमा उंचावण्याचा जाणून प्रयत्न केला जाताे. मात्र फडणवीस पक्षफाेडे आहेत, हे महाराष्ट्राला समजले आहे.
अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘लाव रे ताे व्हिडीओ’ स्टाईलने फडणवीसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. विराेधात असले की महाराष्ट्र अस्थिर, अशांत ठेवण्यासाठी ट्राेलर आर्मी व वेगवेगळ्या टीम कामाला लावतात. विराेधात असताना फडणवीस व त्यांच्या समर्थकांनी कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांना देवदूत म्हटले पण सरकारमध्ये आल्यावर त्यांची सेवा विसरले. जनतेच्या प्रश्नावर विराेधात बाेलल्यावर ईडी, सीबीआयच्या धकम्या दिल्या जातात.
माझ्यावरही व्यक्तिगत आराेप करून धमकाविले जात आहे पण मी घाबरणार नाही. फडणवीसांनी सत्तेसाठी पक्ष फाेडले, राडा केला पण त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही आणि यापुढेही ते मिळणार नाही. या सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर, बारशीटाकळीत शेतकऱ्यांवर पाेलिसांकरवी लाठीचार्ज केला. महाराष्ट्राची जनता हे विसरणार नाही. जाती-धर्मात तेढ वाढविणाऱ्या भाजपला २०२४ च्या निवडणुकीत पायउतार व्हावे लागेल, अशी टीका अंधारे यांनी केली.
संचालन किशाेर कुमेरिया यांनी केले. प्रास्ताविक दीपक कापसे यांनी केले. यावेळी दुष्यंत चतुर्वेदी, सुरेश साखरे, सतीश हरडे, प्रमाेद मानमाेडे, शिल्पा बाेडखे, आसावरी देशमुख, बाळा राऊत, विशाल बरबटे, सुरेखा गाडे, सुशीला नाईक, मंगला गवरे, प्रवीण बरडे, नितीन तिवारी, प्रीतम कापसे प्रामुख्याने उपस्थित हाेते.
नागपूरची दुर्दशा कुणामुळे?स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा गवगवा केला जाताे. मात्र एका पावसाने नागपूर जलमय झाले, पूल पडले, रस्ते खचले याची जबाबदारी महापालिकेवर ढकलली जाते. मात्र सरकारने कुटनीतीने वर्षभरापासून महापालिका बरखास्त केली असून प्रशासन कारभार पाहत आहे. त्यामुळे ही दुर्दशा सरकारचीच जबाबदारी आहे, अशी टीका अंधारे यांनी केली. मुंबई तुंबली तेव्हा फाेटाे काढणाऱ्या अमृताताईंनी आता सेल्फी का नाही काढला, असा कटाक्ष त्यांनी केला. नागपूरच नाही तर राज्यात क्राईम रेट वाढला असल्याची टीकाही त्यांनी केली.