"काँग्रेसची सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्षपद घ्यायला तयार नाही"; राधाकृष्ण विखे पाटील यांनी डागली तोफ
By कमलेश वानखेडे | Updated: February 13, 2025 18:48 IST2025-02-13T18:47:15+5:302025-02-13T18:48:30+5:30
पक्षश्रेष्ठींसमोर दिग्गजांचे पितळ उघडे होत आहे - राधाकृष्ण विखे पाटील

"काँग्रेसची सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्षपद घ्यायला तयार नाही"; राधाकृष्ण विखे पाटील यांनी डागली तोफ
नागपूर : काँग्रेसची सत्ता होती म्हणून लोक टिकून होते. आता सत्ता नाही व येण्याची शक्यता नाही. एवढी निश्चांकी काँग्रेसने कधी गाठली नव्हती. त्यामुळे आता प्रत्येकजण दुसरीकडे बोट दाखवत आहे. प्रदेश अध्यक्ष पद कुणी घ्यायला तयार नाही. सत्ता नाही म्हणून प्रदेशाध्यपदाची संधी नाकारणाऱ्या दिग्गजांचे पक्षश्रेष्ठीसमोर पितळ उघडे पडत आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे. मात्र दिग्गज नेत्यांना डावलून संधी दिली, हे म्हणणे योग्य नाही. कारण दिग्गजच मैदानातून पळून गेले आहेत, असा चिमटा त्यांनी केला. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्यांची बिघाडी सुरु होती. ते राज्याच्या किंवा समाजाच्या हितासाठी नव्हे तर सत्तेसाठी एकत्र आले होता. शरद पवारांबद्दल त्यांना का राग आहे, पवारांना कशासाठी फारकत घ्यायची हे त्या दोघांनाच माहिती, असेही विखे पाटील म्हणाले.
लाडकी बहीण योजना बंद करण्याची गरज नाही
लाडकी बहीण योजनेबाबत न्यायालयाने दिलेल्या मतावर भाष्य करणे उचित नाही. राज्यात सुरू असलेल्या कल्याणकारी योजना या जनतेच्या हितासाठी सुरू केल्या आहेत. शेतीमध्ये मजूर मिळत नाही, अशी कारणे असली याकरिता योजना बंद करण्याची गरज नाही. वेगळा पर्याय असू शकतो. यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
ठाकरे गटाकडे सन्यासाशिवाय मार्ग नाही
कोण कुठे जात आहे त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांना संन्यास घेतल्याशिवाय मार्ग नाही. म्हणून ते पर्याय शोधत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. छगळ भुजबळ यांच्याबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.