लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, बिहारमध्ये जनगणनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी राज्य सरकारला घ्यावी लागेल. मागासवर्ग आयोगातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाहीसुद्धा पूर्ण केली जाईल. आरक्षणाबाबत घाईत कोणताही निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देऊ, असेही त्यांनी सांगितले.
धक्का न लावता आरक्षण : पवार
सोलापूर : मराठा आरक्षण देताना सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एका कार्यक्रमावेळी समाजबांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.
क्रीडामंत्र्यांचा ताफा अडविला
लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी सोमवारी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडविला. तर लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.