लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील खेळाडूंना मैदानावर सराव करण्यासाठी मनपाने परवानगी दिली आहे, पण त्यांना सरावादरम्यान राज्य शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन कठोरपणे करावे लागणार आहे. दुसरीकडे क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनावर प्रतिबंध सुरूच राहणार आहे. या संदर्भात मनपाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाने शुक्रवारी दिशानिर्देश जारी केले आहेत.
मैदानावर सराव करतेवेळी खेळाडूंना, पालक, प्रशिक्षकांसाठी निर्देश जारी दिले आहेत. कुणामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्याला मैदानावर येता येणार नाही.
मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर म्हणाले, सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन करून कोणताही संघटना वा आयोजकांनी स्पर्धेचे आयोजन केले तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
हे आहेत नियम :
- प्रशिक्षण स्थळावर गर्दी नसावी. निर्धारित वेळेत १० ते १५ खेळाडूंनीच यावे.
- १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या खेळाळूंनी वेगळा सराव करावा. त्यांनी वरिष्ठ खेळाडूंसोबत सरावात भाग घेऊ नये.
- सराव स्थळावरील सामग्रीचे एक बॅच गेल्यानंतर स्वच्छता, सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे.
- सर्दी, खोकला, ताप आल्यानंतर खेळाडू, पालक वा प्रशिक्षकाने मैदानावर येऊ नये.
- कोणत्याही स्तरावरील क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिर पुढील आदेशापर्यंत घेऊ नये.