लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर खड्डामुक्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या खासदार रस्ते सुरक्षा समितीच्या सदस्यांसह वाहतूक पोलिसांनी शहरातील काही भागातील रस्त्यांचे निरीक्षण करून काही उपाययोजना सुचविल्या आहे. नागपूरचे रस्ते गुळगुळीत आणि खड्डेमुक्त करण्याचा गडकरी यांचा उपक्रमांतर्गत हा भाग आहे. समितीने सुचविलेल्या सूचनांवर तातडीने उपाययोजना केल्यास शहरातील रस्त्यावर वाहतूक सुरळीत होईल आणि शहर खड्डामुक्त होणार आहे.
खासदार रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य मनोहर मोहिते यांनी वाहतूक पोलिसांसोबत जुना पारडी नाका, हनुमान मंदिर, प्रकाश हायस्कूल, कापसी पूल आणि चिखली चौकातील रस्त्यांचे निरीक्षण केले. जुना पारडी नाका हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत महामार्ग-५३ चा भाग असून या मार्गावर तात्पुरते सिग्नल लावणे, प्रकाश व्यवस्था करणे, जडवाहनांना प्रतिबंधित वेळेत प्रतिबंध लावणे, पाण्याच्या पाईपलाईनचे काम लवकर पूर्ण करणे, दर्शनी भागात अपघातप्रवण स्थळ बोर्ड लावणे, उड्डाण पुलाचे तसेच रस्ते सिमेंटीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करणे आणि मेट्रो व एनएचएआयतर्फे या ठिकाणी ८ ते १० वार्डन नेमण्याचे समितीने सुचविले आहे. याशिवाय पारडी भागातील हनुमान मंदिर आणि प्रकाश हायस्कूल चौकातही अशाच प्रकारच्या सूचना समितीने केल्या आहेत.
याशिवाय कळमना भागातील चिखली चौकातील विकास कामे जागतिक बँकेअंतर्गत सुरु आहेत. या ठिकाणी निरीक्षणानंतर समितीने या भागात प्रकाश व्यवस्था करण्याचे सुचविले आहे. तसेच स्टॉप लाईट व झेब्रा क्रॉसिंग आखणे, स्पीड लिमिट बोर्ड, अपघातप्रवण स्थळ बोर्ड लावणे, वाहनाची गती कमी करण्यासाठी चौकाच्या चारही मुख्य रस्त्यावर चौकाच्या ५० मीटरपूर्वी लहान स्पीडब्रेकर लावावे, झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाईन आखावी, कळमना मार्केटच्या मागील गेटकडे जाणाऱ्या रोडवर दुभाजक बसविणे व मोठे खड्डे बुजविण्यास सुचविले आहे.