चंद्रशेखर बावनकुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ‘जेलभरो’वर टीकानागपूर : संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असताना सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुष्काळाच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत असून जेलभरो आंदोलन हा त्याचाच भाग असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास राज्यातील प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. या भूमिकेवर ऊर्जामंत्र्यांनी टीका केल्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर भाजपा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. राज्यभरातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या असून दुष्काळासाठी ९६० कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीदेखील मराठवाड्याचा दौरा करून स्थिती जाणून घेतली आहे. शेतकरी संकटात आहे व त्याला मदतीसोबत धीर देण्याची गरज आहे. परंतु पक्षविस्तारासाठी जेलभरो आंदोलन करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था आघाडी शासनामुळेच झाली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत कराआम्ही विरोधी पक्षात असताना दुष्काळाच्या प्रश्नावर तत्कालीन शासनाला नेहमीच सहकार्य केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दबदबा आहे. त्याचा उपयोग करुन शेतकऱ्यांना ते मदत का करत नाहीत, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला.दोन महिन्यात ‘एनडीसीसी’ बँकेबाबत निर्णयनागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच ‘एनडीसीसी’ बँकेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांचे हाल होतील, असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. परंतु खासगी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यंदा ६८० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच येत्या २ महिन्यात ‘एनडीसीसी’ बँकेबद्दल अंतिम निर्णय होईल असेदेखील बावनकुळे म्हणाले. २०१६ पर्यंत वीज कनेक्शन देणारराज्यातील अनेक ठिकाणी पाणी असूनदेखील वीजपंप नसल्यामुळे शेतकरी पाणी शेतात आणू शकत नसल्याची स्थिती आहे. जून २०१६ पर्यंत प्रलंबित वीज कनेक्शन देण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले. शिवाय आणेवारीच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना न्याय मिळेल असेदेखील ते म्हणाले.ऊर्जामंत्री करणार लंडनमधील कंपन्यांशी चर्चादरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे लंडनमधील अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात कार्यरत असलेल्या चार कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सौर उत्पादक कंपनीचे युनिट राज्यात सुरू करण्यासंदर्भात ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. बावनकुळे यासाठी रविवारी रात्री लंडनसाठी रवाना झाले. त्यांचा हा दौरा तीन महिन्यांअगोदरच ठरला होता. त्यामुळे ते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीत.
दुष्काळावर राजकारण नको
By admin | Published: September 14, 2015 3:18 AM