लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ८ जुलै राेजी एकाच दिवशी जाेरदार हजेरी लावल्यानंतर अचानक पावसाने दडी मारली. आठवडाभरापासून हजेरी लावल्याप्रमाणे तुरळक पाऊस पडला. नागपूरसह काही जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अशीच ‘ड्राय डे’सारखी स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपुरात पुढचे तीन दिवस नागरिकांना अशाच उष्णतेचा सामना करावा लागेल. अल्प काळासाठी तुरळक पावसाची शक्यता आहे. १९ जुलै राेजी थाेडा जाेर वाढण्याची आणि २० राेजी मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने नाेंदविली. दरम्यान, तापमानात २४ तासात १.१ अंशाची वाढ झाली असून ३२.६ अंश नाेंदविण्यात आले.
मध्य महाराष्ट्र व शेजारील राज्यात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. २१ जुलैपर्यंत बंगालचा उपसागर व शेजारी हवेचा दबाव वाढण्याची शक्यता असून त्यानंतर वातावरण बदलण्याचा अंदाज आहे. नागपूरसह भंडारा, गाेंदिया, अमरावती, गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस हाेईल, अन्यथा तीन चार दिवस ‘ड्राय डे’ जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र वर्धा, अकाेला, यवतमाळ व वाशिम भागात चांगला पाऊस हाेण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. १९ व २० राेजी सर्व जिल्ह्यात सर्वव्यापी व चांगला पाऊस हाेण्याची शक्यता आहे.