निशांत वानखेडे
नागपूर : थ्री इडियट्सचा इंजिनिअर रॅन्चाे बाळंतपण करताना तुम्ही पाहिला आहे. हा टेलिमेडिसीनचा प्रकार आहे, कारण पलीकडे डाॅक्टर असलेली करिना त्याला मार्गदर्शन करीत असते. मात्र भविष्यात अशा रॅन्चाेचीही गरज पडणार नाही. दूरवर असलेले डाॅक्टर रुग्णाच्या शरीरात एक डिव्हाइस लावतील आणि तुमच्या माेबाइलमध्ये त्याची कमांड असेल. माेबाइल ॲप रुग्णाची प्रकृती माॅनिटर करेल आणि ठरलेल्या वेळी औषध आपाेआप पाेटात टाकेल. कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने ऑपरेशनही शक्य हाेईल.
आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण चमत्कार वाटणारे हे भविष्य आताच सत्यात उतरत आहे. एमडीयू विद्यापीठ, राेहतकचे औषधी निर्माणशास्त्र विभागप्रमुख व सेंटर ऑफ आयपीआरचे संचालक डाॅ. हरीश दुरेजा यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना या संशाेधनावर प्रकाश टाकला. मनाेरुग्णावर या डिजिटल थेरेप्युटिकचा प्रयाेग यशस्वी हाेत आहे. मनाेरुग्णांना औषध देणे अनेकदा कठीण असते. यावर उपाय म्हणून ३० टॅब्लेट्सचा एक पॅच पाेटात जाेडण्यात आला. एक आराेग्य ॲप रुग्णाचे वर्तन व प्रकृतीवर नजर ठेवते आणि त्याबाबत डाॅक्टरांना सूचित करते. तिकडून डाॅक्टराने औषधाची कमांड दिल्यावर आपाेआप एक टॅब्लेट शरीरात जाते. रुग्णाला काही कळतही नाही की औषध पाेटात गेले.
या वैद्यकीय तंत्रज्ञानाला जगात सुरुवातही झाली आहे. जपानने डिजिटल थेरेप्युटिकचे ॲपही विकसित केले आहेत. ‘रि-सेट’ हा जगातील पहिला थेरेप्युटिक डिव्हाइस आहे. याशिवाय मनाेरुग्णांसाठी ‘साेमरिस्ट’, मधुमेहींच्या ग्लेकाेजचे प्रमाण तपासण्यासाठी ‘ब्ल्यू स्टार’, हृदयराेग्यांच्या मानिटरिंगसाठीही माेबाइल ॲप कार्यरत आहे. हे सर्व वैद्यकीय साॅफ्टवेअरचे काम करीत आहेत.
उपचार करणारे माेबाइल गेम
माेबाइल गेमने मुलांनी आत्महत्या करणे किंवा दुष्परिणाम हाेण्याच्या तक्रारी आपण ऐकल्या आहेत. मात्र आता वाईट नव्हे तर चांगल्या कारणासाठी माेबाइल गेम विकसित केले जात आहेत. ते खेळताना रुग्ण मुलांवर विशिष्ट तंत्राने आपाेआप उपचार हाेतील. लवकरच हे सत्यात उतरेल, असे डाॅ. दुरेजा यांनी सांगितले.
अनेकांच्या घरी डिजिटल हेल्थ डिव्हाइस
पूर्वी काहींच्या घरी औषध ठेवले राहत हाेते. मात्र काेराेनानंतर परिस्थितीच बदलली आहे. आता अनेकांच्या घरी थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पेसमेकर हे डिजिटर हेल्थ डिव्हाइस आहेत. एवढेच नाही तर रक्तदाब, पल्स माेजणारी किंवा आपण दिवसभरात किती चालताे हे माेजणारे घड्याळ असते. असे अनेक आराेग्य साहित्य दैनंदिन जीवनाचा भाग हाेत आहेत.
सायबर सुरक्षा व विश्वसनीयता
यापुढे काेणत्याही रुग्णाची जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आराेग्य इतिहास डाटा स्वरूपात उपलब्ध राहील. एक बारकाेड स्कॅन केले की डाॅक्टर त्याचा पूर्व इतिहास पाहू शकतील व उपचार करतील. मात्र या नव्या वैद्यकीय तंत्रापुढे सायबर सुरक्षा व विश्वसनीयतेचे आव्हान राहील. नुकतेच डिजिटल चाेरांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाची वेबसाइट हॅक करून खंडणी मागितली हाेती. याशिवाय अनेक वैद्यकीय साहित्य बाेगस ठरण्याची भीती आहे. यासाठी जपान, अमेरिका, युराेपमध्ये रेग्युलेशन ॲथॉरिटी स्थापन झाली आहे. भारतातही त्याची गरज असल्याचे डाॅ. दुरेजा म्हणाले.