लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली आहे. या कारणामुळे जम्मू-काश्मीरचा प्रवास न करू शकलेल्या नागपूरच्या २० प्रवाशांना बुकिंगची रक्कम वापस देण्यास विमान कंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अनेक प्रवाशांची रक्कम हडपण्याची तयारी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूरचे रहिवासी हरिहर पांडे यांनी ८ मार्च रोजी इंडिगो एअरलाईन्सच्या १८ मे रोजी श्रीनगर ते नागपूर या विमानाचे तिकीट काढले होते. ग्रुप बुकिंग असल्यामुळे १ लाख २१ हजार इतक्या रकमेच्या २५ टक्के म्हणजेच ३० हजार १३० रुपयाची रक्कम जमा केली होती. उर्वरित ७५ टक्के रक्कम ३ मे रोजी जमा करण्यास सांगण्यात आले होते. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये हे सर्व लोक १० मे रोजी रेल्वेने श्रीनगरला जाणार होते. परतीचा प्रवास विमानाने करणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना प्रवास रद्द करावा लागला. लॉकडाऊनदरम्यान रेल्वेगाड्या व देशांतर्गत उड्डाणे बंद आहेत. असे असतानादेखील रविवारी दुपारपर्यंत बुकिंगचे उर्वरित ९० हजार ९३० रुपये जमा केले नाही तर अगोदर भरलेली रक्कम वापस होणार नाही, असा संदेश त्यांना एअरलाईन्सकडून आला. १८ मेच्या विमानासंदर्भात विचारणा केली असता, याबाबत कुठलेही उत्तर देण्यात आले नाही. आमची कुठलीही चूक नसताना एअरलाईन्सने अशा पद्धतीने पैसे मागणे व अगोदरची रक्कम वापस न करणे हे अयोग्य आहे. आम्ही आमचे पैसे असे हडपू देणार नाही. ‘डीजीसीए’ व नागरी उड्डाण मंत्रालयाला तक्रार करू, असे हरिहर पांडे यांनी सांगितले.