मा.गो. वैद्य : ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा प्रचाराचा मुद्दा होऊ नये नागपूर : एकीकडे राज्यभरात सुरू असलेले मराठा मूक मोर्चे आणि दुसरीकडे ‘अॅट्रॉसिटी’संदर्भात सुरू असलेला वाद यामुळे राजकारण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मौन साधले आहे. मात्र जातीय आधारावर आरक्षण देण्यात येऊ नये असे मत संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांअगोदरच ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली होती हे विशेष. नागपुरात प्रसिद्धीमाध्यमांसमवेत ते बोलत होते. जातीय आधारावर देण्यात येणारे आरक्षण संपविण्याची वेळ आली आहे. केवळ अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांनाच जातीय आरक्षण देण्यात यावे. मात्र त्याचीदेखील मर्यादा सरकारने निर्धारित करायला हवी, असे वैद्य म्हणाले. आजच्या तारखेत जवळपास सर्वच जातीपंथांमध्ये गरिबांचे लक्षणीय प्रमाण आहे. अशा स्थितीत आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे, असे ते म्हणाले. ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की देशाच्या जवानांनी शौर्य दाखवत जगात भारताची मान उंच केली आहे. या मुद्यावर कुठल्याही पक्षाने निवडणुकांच्या तोंडांवर राजकारण करू नये.(प्रतिनिधी)
जातीय आधारावर आरक्षण नको
By admin | Published: October 18, 2016 2:42 AM