नरेश डोंगरे
नागपूर : महिना संपला अन् आणखी १४ दिवस झाले. मात्र, एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे अद्याप पगार केले नाही. त्यामुळे एसटीत काम करणाऱ्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त कर्मचारी संघटनांनी मंगळवारी राज्याचे परिवहन मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात २६०० कर्मचारी काम करतात. त्यांच्या पगारापोटी महामंडळाला दर महिन्याला सुमारे साडेसहा कोटींचा खर्च येतो. विदर्भातील कर्मचाऱ्यांची संख्या २० हजार तसेच राज्यातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८९ हजार असून, त्यांच्या पगारापोटी महामंडळाला महिन्याला सुमारे साडेतीनशे कोटींचा खर्च करावा लागतो.
विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांना आधीच तुटपुंजा रकमेचा पगार मिळतो. मात्र, जो काही मिळायचा तो दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत मिळावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. कारण या पगारावरच प्रत्येकाच्या कुटुंबाचे अंदाजपत्रक अवलंबून असते. धान्य, किराणा, दूध, सिलिंडर, मुलांच्या शाळेचा खर्च तसेच काही दुखले सुखले तर एसटीच्या कर्मचाऱ्यांची घरगुती गाडी उधारीवर चालते. मात्र, ७ च काय १०, १२ तारीख होऊनही एसटीकडून पगार मिळत नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची तीव्र आर्थिक कोंडी होते.
पगाराची ही नेहमीचीच बोंब असल्याने यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयाकडेही दाद मागितली होती आणि त्यासंबंधाने ३ सप्टेंबर २०२१ ला निकाल देताना न्यायालयाने प्रत्येक महिन्याच्या देय तारखेस एसटी कामगारांना वेतन दिले पाहिजे, असा निकाल दिला होता. मात्र, त्याचेही महामंडळाकडून पालन होत नाही. सध्या एसटीचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. परंतु, रात्रंदिवस काम करूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. गेल्या महिन्यात १३ जानेवारीला पगार झाला होता, तर आता १४ तारीख होऊनही पगार झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
आज नोटीस, उद्या याचिका
प्रलंबित वेतनासाठी कामगार संघटनेने मंगळवारी राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे. आज, बुधवारी, १५ फेब्रुवारीपर्यंत पगार झाला नाही तर उद्या, गुरुवारी फाैजदारी स्वरूपाची अवमान याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.