लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या सर्वच प्रभागात सिवरेज लाईन व चेंबर नादुरुस्तीमुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रार केली तर प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगून मोकळे होतात. अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
राजाबाक्षा, मेडिकल चौक येथील सिवरेज लाईन मागील दोन महिन्यापासून तुंबल्याने दूषित पाणी वस्तीतून वाहत आहे. घरातील शौचालय व बाथरूममध्ये घाण पाणी साचले आहे. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली. दोनदा झोन कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतरही समस्या न सुटल्याने थेट आयुक्तांकडे तक्रार केली. परंतु अजूनही सिवरेज लाईन दुरुस्त केलेली नाही. वस्तीत कचऱ्याचा ढिगारा दिसला तर मनपा प्रशासन संस्था, हॉस्पिटलला नोटीस बजावून दंड आकारला जातो. मनपा प्रशासनावर कोण कारवाई करणार, असा सवाल अरुण खरे, मोहन पडोळे, अजय कोल्हे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केला आहे. अशाप्रकारच्या तक्रारी त्रिमूर्तीनगर, दिघोरी, ताजबाग परिसरातील नागरिकांनीही केलेल्या आहेत. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. महापौरपदाची सूत्रे स्वीकारताच दयाशंकर तिवारी यांनी विकास योजनांची घोषणा केली. पण सिवरेज व चेंबर दुरुस्त होत नसेल तर प्रकल्प पूर्णत्वास कसे जाईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
....
३१ कोटीचा प्रकल्प कागदावरच
शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करून ३१ कोटी ३० लाख २९ हजार ८६८ रुपयाच्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीच्या प्रकल्पाला मंजुरी देऊन निविदा काढण्याचे निर्देश स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत तिन्ही सिवर झोनमधील मलनिस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. परंतु दोन महिने झाले तरी प्रशासनाने प्रक्रिया केलेली नाही.