लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालय २३ नाेव्हेंबरपासून तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर व ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालय काेराेनाच्या नियमावली व उपाययाेजनांचे काटेकाेरपणे पालन करीत सुरू झाले आहे. आता १४ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर शाळांमधून एकही विद्यार्थी काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आलेला नाही, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी मंगला गजभिये यांनी दिली.
काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल १० महिन्यानंतर शाळा उघडण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग व त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात ९ ते १२ वर्गापर्यंत ६,०७१ विद्यार्थी असून, २,९१८ विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत. तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या ८२ शाळेत एकूण ७,१६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ३,७०६ विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित हजेरी दर्शविली आहे. काेराेनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने शाळांची दारे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. यात शासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आवश्यक साेईसुविधांसह शाळा-महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाची भीती कमी झाली असली तरी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसून येत नाही.
विद्यार्थ्यांची दरराेज थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन तपासणी प्राधान्याने हाेत असल्याने शिक्षक काेराेनाला राेखण्यात यशस्वी ठरले आहेत. वर्गखाेल्यात ठराविक अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली जात आहे. एकत्रित जेवण व खेळण्यास मनाई आहे. पहिल्या दिवसापासून काेराेना नियमावलीचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असून, मास्कचा वापर व इतर बाबी काेराेनाला हरविण्यास समर्थ ठरत आहेत.