लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : देशभरात आदिवासी बांधवांवर हाेत असलेले अत्याचार व अन्याय बंद करण्यात यावे तसेच त्यांना संवैधानिक हक्क व अधिकार प्रदान करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. १५) दुपारी कुही तहसील कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार बाबाराव तीनघसे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविण्यात आले.
देशभरातील आदिवासी बांधवांवर नेहमीच अन्याय व अत्याचार केला जात आहे. याला कायम आळा घालावा तसेच त्यांना संवैधानिक अधिकार व हक्क देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदाेलनाला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी घेण्यात आलेल्या छाेटेखानी सभेत नेत्यांनी देशभरातील आदिवासी बांधवांमधील शिक्षणाचे प्रमाण, त्यांच्यावर हाेणारे अत्याचार, दडवली जाणारी अत्याचाराची प्रकरणे, त्यासाठी निर्माण केला जाणारा राजकीय दबाव यासह अन्य मूलभूत बाबींचा पाढा वाचला.
या आंदाेलनात राजानंद कावळे, प्रमोद घरडे, सिद्धार्थ मेश्राम, धम्मपाल मेश्राम, सचिन सोयम, प्रकाश सिडाम, कुंदा सिडाम, सविता उईके, अनुसया धुर्वे, लता इवनाते यांच्यासह कुही तालुक्यातील आदिवासी बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या. केंद्र व राज्य सरकारने आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेत त्या साेडवाव्या, अशी मागणीही करण्यात आली.