सुनील चरपे
नागपूर : मृग पूर्ण व अर्धे आर्द्रा नक्षत्र काेरडे गेले आहे. राज्यात सर्वदूर पेरणीयाेग्य पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यात किमान १४० लाख हेक्टरपैकी १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, विदर्भ, खान्देश व मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.
राज्यात १० जूनपर्यंत सरासरी ७० मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना यावर्षी १३.५ मिमी काेसळला. मागील वर्षी याच काळात ६८.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. २० जूनपर्यंत सरासरी १३८.४ मिमी पाऊस काेसळताे. यावर्षी ६०.१ मिमी पाऊस झाला असून, मागील वर्षी २१६ मिमी पाऊस काेसळला हाेता. ३० जूनपर्यंत सरासरी २८२.१ मिमी पाऊस काेसळताे. मागील वर्षी ३० जूनपर्यंत २८२.१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. यावर्षी २८ जूनपर्यंत राज्यात सरासरी १९३.८ मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना १३४.६ मिमी पाऊस काेसळला. मागील वर्षी याच काळात १३९.७ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.
विशेष म्हणजे हा पाऊस पेरणीयाेग्य नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली. राज्यात २७ जूनपर्यंत १२.२ टक्के पेरणी आटाेपली असून, यात धूळ पेरणीचा समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात ८७.८ टक्के पेरणी अद्याप व्हायची आहे.
पेरणीयाेग्य काळ व उत्पादनावरील परिणाम
कृषी विभागाच्या पीक कॅलेंडरनुसार(२ जानेवारीपासून) राज्यात कपाशी व साेयाबीनच्या पेरणीचा याेग्य काळ हा सरासरी २३ ते २८ व्या आठवड्यादरम्यान म्हणजेच १२ जून ते १६ जुलै, तर धानाचा पेरणीयोग्य काळ हा २७ ते ३० आठवड्यांचा म्हणजेच ३ ते ३० जुलै दरम्यानचा आहे. या काळात कपाशी, साेयाबीन व धानाच्या पिकांची पेरणी केल्यास पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम हाेत नाही. त्यानंतर पेरणी केल्यास पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते.
पिकांना पावसाची गरज
कपाशीला जून व जुलैमध्ये सरासरी ८२.४ ते १२६ मिमी, ऑगस्टमध्ये १०१.३ ते १६१.० मिमी, सप्टेंबर-ऑक्टाेबरमध्ये २२५.४४ ते ३२५.७ मिमी पावसाची गरज असते. साेयाबीनच्या पिकाला जून-जुलैमध्ये सरासरी ४६.९ मिमी, सप्टेंबरमध्ये १३७.७ मिमी, ऑक्टाेबरमध्ये ७७.४ मिमी आणि त्यानंतरच्या काळात ४५.७ मिमी पावसाची आवश्यकता असते. धानाच्या पिकाला जुलैमध्ये सरासरी १४७.३ ते १८८.२ मिमी, तर ऑगस्टमध्ये ११९.३ मिमी ते २५५.५ मिमी पावसाची आवश्यकता असते.
उशिरा पेरणीचा साेयाबीनला धाेका
१६ जुलैनंतर पेरणी झाल्यास साेयाबीनच्या पिकाला कापणीच्यावेळी परतीच्या पावसाचा धाेका उद्भवू शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनी १६ जुलैनंतर साेयाबीनची पेरणी करणे टाळावे. त्याला पर्याय म्हणून मका किंवा कपाशीची निवड करावी. विदर्भात धानाचे पीकही परतीच्या पावसामुळे खराब हाेऊ शकते. सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरण असल्यास काही प्रमाणात कपाशीच्या पात्या व बाेंडगळ हाेऊ शकते, अशी माहिती यवतमाळ येथील शेतकरी मिलिंद दामले यांच्यासह कृषी विभागाने दिली.
...