दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला होता. अशा स्थितीत महाराष्ट्र शासनाकडे विविध सवलतींचे असलेले पैसे मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला होता. परंतु अजूनही एसटीची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. प्रत्येक महिन्यात पगारासाठी सात तारीख गेल्यावरही आठ दिवस कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. ऑगस्ट महिन्यात कामगार न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलेही वेळेवर मिळत नसल्यामुळे प्रकृती बिघडल्यास उपचार कसे घ्यावेत, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण आगार-८
वाहक-७४९
चालक-९२३
अधिकारी-४१
एकूण कर्मचारी -२६६६
पगारासाठी महिनाभराची प्रतीक्षा
-मागील दीड वर्षापासून एसटीची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन देणे एसटी महामंडळाला कठीण होत आहे. वेळोवेळी राज्य शासनाने मदत केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला. परंतु, अद्यापही एसटीची आर्थिक स्थिती रुळावर आली नसल्यामुळे दर महिन्याला वेळेवर कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही. कधी १५ दिवस तर कधी महिनाभर कर्मचाऱ्यांना वेतनासाठी वाट पाहावी लागत आहे.
वैद्यकीय बिले दीड वर्षापासून मिळेनात
-दीड वर्षापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिले मिळालेली नाहीत. वैद्यकीय बिलांसोबत कोरोनाच्या उपचाराची बिलेही कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने दिली नाहीत. प्रकृती बिघडल्यानंतर एसटी कर्मचारी डॉक्टरकडे उपचार घेतात. त्याची बिले एसटी महामंडळाकडे सादर करतात. परंतु, दीड वर्ष बिलासाठी वाट पाहावी लागत असल्यामुळे उपचारासाठी इतरांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करावी, असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे.
वैद्यकीय बिल वेळेवर द्यावे
‘उपचारासाठी खर्च केलेली रक्कम वेळेवर मिळत नाही. मागील वर्षभरापासून सादर केलेले वैद्यकीय बिल मिळाले नाही. त्यामुळे प्रकृती बिघडल्यास उसने घेऊन उपचारावर केलेल्या खर्चाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न पडतो.’
-विलास चव्हाण, चालक
उपचार कसे करावेत?
‘आधीच वेतन वेळेवर मिळेनासे झाले आहे. त्यात प्रकृती बिघडल्यानंतर मोठी रक्कम खर्च होते. त्यामुळे उपचार कसे करावेत, असा प्रश्न पडतो. एसटी महामंडळाने उपचारावर खर्च केलेली वैद्यकीय बिले त्वरित देण्याची गरज आहे.’
-कैलाश जाधव, वाहक
............