लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचे ट्रेनिंग तसेच नोकरी देण्याचे आमिष दाखवून पंजाबमधील एका आरोपीने नागपुरातील तीन तरुणांकडून बारा लाख रुपये हडपले. अंबाझरी पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल केला.
आरोपीचे नाव नवनीत मेहता असून तो स्वतःला एजीईडी मेजर म्हणवून घेतो. पंजाबमधील भटिंडा येथे मेन्टेनन्स इंजिनिअरिंगचे ट्रेनिंग आणि ट्रेनिंगनंतर नोकरी देण्याची हमी देऊन आरोपी मेहताने शुभम रामचंद्र ठवरे (रा. जागनाथ बुधवारी, कैलास टॉकीजजवळ), श्रीनिधी ड्युवटेलवार आणि संकलेश राऊत यांना २०१२ मध्ये आपल्या जाळ्यात ओढले. त्याने सर्वांना स्वतःच्या क्लासमध्ये ॲडमिशन दिली. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगून ६ जून २०१२ ते मे २०१७ या कालावधीत शुभम कडून ४ लाख २५ हजार, श्रीनिधी आणि संकलेशकडून प्रत्येकी तीन लाख ७५ हजार असे एकूण ११ लाख ७५ हजार रुपये घेतले. मात्र आतापर्यंत त्यांना कोणतेही ट्रेनिंग दिले नाही आणि नोकरीही मिळवून दिली नाही. आरोपी वेगवेगळी थापेबाजी करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे या तिघांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. दीर्घ चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मेहताविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.