लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. शाळा बंद केल्याने डिजिटल शिक्षणाची कास धरणाऱ्या शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, तिथे रेडिओ व टीव्हीवरून अभ्यासाचे धडे देणे सुरू केले. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ अशी शेखी मिरविणाऱ्या विभागाचे टीव्ही, रेडिओ व मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्षच गेले नाही. नागपूर जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी घरी कुठलिही सुविधा नसलेले तब्बल १५ हजार ७२५ विद्यार्थी असल्याचे चिंतादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे यात शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांची संख्या अधिक आहे.
शाळा बंदला ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय जेव्हा शासनाने ठेवला. तेव्हा नागपूर जि.प.च्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २०३८ शाळा, ४४९८ शिक्षक तर १५७२५२ विद्यार्थी आढळले. या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे असलेल्या संसाधनांची वर्गवारी करण्यात आली. यात टीव्ही, रेडिओ व मोबाईल असलेल्या पालकांची नोंद घेण्यात आली. सोबतच या तिन्ही सुविधा नसलेल्या पालकांचा वेगळा गट तयार करण्यात आला. दूरदर्शनच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘टिलीमिली’ ही महामालिका सुरू करण्यात आली. रेडिओच्या माध्यमातून ‘शाळा बाहेरची शाळा’ हा उपक्रम राबविण्यात आला. ज्यांच्याकडे मोबाईल आहे, त्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर धडे देण्यात आले. पण या तिन्ही गोष्टी नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत चार महिन्यापासून शिक्षणच पोहचले नाही. तो पोहचविण्याचा प्रयत्नही शिक्षण विभागाकडून झालेला नाही. काही शिक्षकांनी प्रयत्न केले, पण ते बोटावर मोजण्याइतकेच आहे.
- कुठलीही साधने नसलेले तालुकानिहाय विद्यार्थी
नागपूर ग्रामीण २७२१
हिंगणा १७९९
कामठी १५६३
काटोल ११३४
नरखेड १०३२
सावनेर १०९३
कळमेश्वर ८७२
रामटेक १०२४
मौदा १०३७
पारशिवनी ९३६
उमरेड १०६९
कुही ८६५
भिवापूर ५८१
- शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार
१५ हजारावर विद्यार्थ्यांकडे कुठलाही पर्याय नाही आणि विभाग त्यांच्यासाठी काहीही करीत नाही, ही खरचं शोकांतिका आहे. साधने नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेणे आणि काहीच न करणे म्हणजेच त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे.
दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी