पालकांचा शाळा सुरू करण्यास विरोध, विद्यार्थांची जबाबदारी कोण घेणार?
नागपूर : राज्य सरकारने २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा नागपुरातील पालकांच्या संघटनेने विरोध केला आहे. जोपर्यंत कोरोनाचे व्हॅक्सिनेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करू नये, अशी पालकांची मागणी आहे. राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने यासंदर्भात शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री सचिवालयाला निवेदन देऊन शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, या माध्यमातून शाळांचा पालकांकडून शुल्क वसुलीचा फंडा आहे. शाळा पालकांकडून संमतीपत्र घेऊन पालकांवरच जबाबदारी ढकलत आहे. संघटनेचे म्हणणे आहे? की, मुलांना शाळेत कोरोनाचा धोका होणार नाही, झाल्यास त्या मुलाच्या खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च शाळा स्वत: भरेल, असे संमतीपत्र शाळांनी सुद्धा पालकांना द्यावे. एकीकडे कॉलेज अजूनही सुरु झालेले नाही, तर शाळा का सुरू करण्यात येत आहे? असाही सवाल संघटनेने केला आहे. बुधवारी संघटनेच्या नेतृत्वात शहरातील भवन्स, सेंटर पॉईंट, स्पीक अॅण्ड स्पॅन, संस्कार विद्यासागर, नारायणा, सेंट पलोटी, स्कूल ऑफ स्कॉलर आदी शाळांमधील पालक सहभागी झाले होते. संघटनेचे संयोजक योगेश पाथरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी कैलास चौधरी, तृप्ती देशपांडे, धनंजय चौधरी, मदन कोहळे, विशाल डोईफोडे, ईश्वर कोल्हे आदी उपस्थित होते.