दहावी, बारावीच्या पालकांनी व्यक्त केली खंत
नागपूर : दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिल महिन्यात ऑफलाईन होणार आहे. कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नोव्हेंबरमध्ये कशातरी शाळा सुरू झाल्या. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, प्रशासनाने ७ मार्चपर्यंत शाळा बंद केल्या. शाळा, ज्युनिअर कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक लागली होती. आता शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल? याची चिंता पालकांना सतावत आहे.
कोरोना संक्रमणात परीक्षेचे नियोजन बोर्डासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ऑफलाईन परीक्षा असल्याने पालकांनाही परीक्षा देण्यासाठी पाठविण्याबाबत काहीसी भीती आहे. पण या भीतीपेक्षा शाळा बंद झाल्याने पालक पुन्हा चिंतेत आहे. नागपूर जिल्ह्यातील काही पालकांशी यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी बोर्डाची आहे. कोरोना असल्याने बोर्ड त्या दृष्टीकोनातून सुरक्षात्मक उपाययोजना करणारच आहे. पालक म्हणून आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करूनच पाठविणार आहोत. पण खरा प्रश्न आहे, की शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करायला लागले होते. सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी होणार होती. किमान त्या माध्यमातून परीक्षेची तयारी होणार होती. मात्र, शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटणार आहे. कोरोनाचे संकट पुढे किती दिवस राहाते, शाळा पुन्हा सुरू होतील की नाही, हा प्रश्न आहे.
- माझी मुलगी दहावीची परीक्षा देणार आहे. परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे. त्यामुळे मुलांचे योग्य मूल्यांकन व त्याला गुणवत्ता सिद्ध करता येईल. बोर्ड करेल ना सुरक्षात्मक नियोजन.
राजेश भागवतकर, पालक
- परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची बोर्ड घेईल ना काळजी. पण, खरी काळजी आता शाळा ज्या बंद झाल्यात ना, त्याची आहे. मुले कशीतरी अभ्यासाला लागली होती. शालेय परीक्षेच्या माध्यमातून त्यांची उजळणी होणार होती. शाळा बंद झाल्याने पुन्हा विद्यार्थ्यांची लिंक तुटेल.
दिलीप आडे, पालक
- प्रशासनाने केवळ दहावी व बारावीचे वर्गच सुरू करायला हवे होते. उगाच पाचव्या वर्गापासून शाळा सुरू केली. त्यामुळे शाळेत गर्दी झाली आणि विद्यार्थी संक्रमित झाले. परिणामी शाळा बंद कराव्या लागल्या. पण, शाळा बंद केल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार आहे. सर्वच मुलांकडे ऑनलाईनची साधने नाहीत आणि विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्यानेही घेत नाहीत. शाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी होत होती.
- रिना चवरे, पालक
- कोरोनाच्या भीतीमुळे मुलांना वर्षभर शाळेत पाठविले नाही. परंतु परीक्षेसाठी त्यांना शाळेत पाठवून अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊ देणे म्हणजे एकप्रकारे कोरोनाला निमंत्रण देणे होय. मुलांमध्ये भीती असल्याने ते परीक्षेत एकाग्रपणे राहून पेपर सोडवू शकणार नाहीत. यासाठी परीक्षा ऑनलाईन घेणेच संयुक्तिक आहे.
बाळा आगलावे, पालक
- दहावी आणि बारावीच्या मुलांना कोरोना कळतोय. खबरदारी घ्यावी हेसुद्धा त्यांना माहिती आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मुले खबरदारी घेतच होती. शाळांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. शिक्षण चांगले सुरू होते. मुलेही परीक्षेच्या तयारीत व्यस्त झाली होती. त्यामुळे दहावी आणि बारावीचे वर्ग किमान बंद करायला नको होते.
रामचंद्र उमाठे, पालक
- विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही. शाळेत कसातरी अभ्यासक्रम पूर्ण झाला असता, सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांचा सराव झाला असता. अभ्यासक्रमच पूर्ण होणार नाही, तर परीक्षा कशी देणार, याची काळजी आहे.
विलास कांबळे, पालक