नागपूरच्या सिव्हिल लाईन्समधील ध्वनी प्रदूषणाचा न्यायमूर्तींना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:42 PM2019-01-31T22:42:59+5:302019-01-31T22:46:27+5:30
उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी गेल्या सोमवारी सिव्हिल लाईन्समधील ध्वनी प्रदूषण व वाहतूक कोंडीची सदर पोलिसांकडे मौखिक तक्रार नोंदविल्याची पक्की माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चक्क न्यायमूर्तींना अशी तक्रार करावी लागल्यामुळे पोलिसांवर स्वत:च्या कर्तव्यनिष्ठतेवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी गेल्या सोमवारी सिव्हिल लाईन्समधील ध्वनी प्रदूषण व वाहतूक कोंडीची सदर पोलिसांकडे मौखिक तक्रार नोंदविल्याची पक्की माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चक्क न्यायमूर्तींना अशी तक्रार करावी लागल्यामुळे पोलिसांवर स्वत:च्या कर्तव्यनिष्ठतेवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लब येथे रात्री १० वाजतानंतरही मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात होते. तसेच, या परिसरात वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. याचा प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे न्यायमूर्तींनी सदर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करून संगीत थांबवले व वाहतूक मोकळी केली. तक्रारकर्ते न्यायमूर्तींनी उच्च न्यायालय व्यवस्थापकांना हा विषय पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासमक्ष मांडण्याचे निर्देशही दिले, अशी माहिती मिळाली आहे. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार, शहरातील सर्व क्लबस्, लॉन्स व मंगल कार्यालयांना रात्री १० वाजतानंतर संगीत वाजविण्यास मनाई करणारे निर्देश पोलीस विभागाद्वारे जारी केले जाणार आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. परंतु, पोलिसांनी केवळ काही दिवसांकरिता थातूरमातूर कारवाई करू नये. सर्व दिवस नियमांचे पालन होईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.