- महामेट्रो : डबलडेकर पुलावर प्रायोगिक तत्त्वावर लागले साऊंड बॅरिअर
आनंद शर्मा
नागपूर : क्रिकेटमधील क्वॉर्कच्या मटेरियलसारख्या दिसणाऱ्या रॉक वूलच्या मदतीने वर्धा रोडवर ध्वनिप्रदूषण थांबविण्याची कवायत महामेट्रोतर्फे करण्यात येत आहे. याकरिता वर्धा रोडवर अजनी चौक ते एअरपोर्टपर्यंतच्या डबलडेकर पुलावर रेडिसन ब्ल्यू चौक परिसरात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर साऊंड बॅरिअर लावण्यात आले आहेत. त्या माध्यमातून ध्वनिस्तर तपासण्यात येत आहे.
१०० मीटर अंतरावर लावण्यात आलेले दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे हे साऊंड बॅरिअर जाळीसारखे आहेत. जाळीच्या खालील भागात काच लावले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना बाहेरील दृश्य सहजरित्या पाहता येते. अॅल्युमिनियमपासून तयार जाळीच्या साऊंड बॅरिअरमध्ये १०० मिलिमीटरची खुली जागा आहे. त्या ठिकाणी रॉक वूल नावाचे मटेरियल भरले आहे. पुलावरून वाहन जाताना हॉर्न, ब्रेक आदींचा आवाज येतो. रॉक वूल मटेरियल आवाजाला ओढून घेते, तर काही आवाज जाळीदार अॅल्युमिनियम साऊंड बॅरिअरच्या अन्य भागांना धडकून परत पुलावर परततो. त्यामुळे पूलाच्या दोन्ही बाजूकडील घर, कार्यालय, रुग्णालयामध्ये वाहनांचे आवाज पोहोचत नाहीत. या प्रकारे ध्वनिप्रदूषणाच्या धोक्यापासून बचाव होतो.
मशीन करते आवाजाची गणना
साऊंड बॅरिअर लावण्यापूर्वी मशीनने पुलावर वाहनांमुळे होणाऱ्या आवाजाची गणना डेसिबलमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर साऊंड बॅरिअर लावण्यात आले आहे. आता मशीनने पुन्हा आवाजाची गणना करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात पुलावर वाहनांची संख्या कमी असल्याने साऊंड बॅरिअर योग्यरीत्या काम करीत आहे वा नाही, याचे आकलन होऊ शकले नाही. आता पुलावर वाहनांची संख्या वाढल्याने साऊंड बॅरिअरची सिद्धता पुढे येणार आहे.
वाय जंक्शनवरसुद्धा लागणार
दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे साऊंड बॅरिअर एप्रिल महिन्यात लावले असून त्याद्वारे कोणत्या कंपनीचे उपकरण चांगले आहे, हे दिसून येईल. त्यानंतर वाय जंक्शन परिसरात मनीषनगर दिशेने लावण्यात येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.