ठळक मुद्देसलग तीन दिवस रस्त्यावर अडून होता मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथे पदाधिकाऱ्यांनी, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.मोर्चाचे नेतृत्व करणारे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले, शासनाने सप्टेंबर २०१६ पासून २० टक्के अनुदानप्राप्त सर्व शाळा, तुकड्या, वर्ग यांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याबाबत मार्च २०१८च्या अधिवेशनात आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण झाले नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ जुलै रोजी सेवाग्राम (वर्धा) ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. १० जुलै रोजी या दिंडीचे रूपांतर नागपुरात मोर्चात झाले. मात्र मागण्यांच्या पूर्ततकडे शिक्षणमंत्री लक्ष देत नसल्याचे पाहून मोर्चा अडून बसला. सलग तीन दिवसानंतरही मोर्चा जागा सोडायला तयार नसल्याने गुरुवारी पोलिसांनी अटक करण्याची भाषा वापरली. मात्र, आ. नागो गाणार यांनी मध्यस्थी करीत मोर्चाचे रूपांतर आंदोलनात केले. मोर्चेकरी पायी चालत यशवंत स्टेडियम येथे येऊन धरणे-आंदोलनाला बसले. यावेळी झालेल्या बैठकीत बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला. उद्या शुक्रवारी मागण्यांवर निर्णय न झाल्यास आम्ही उग्र आंदोलन करू असा, इशाराही जगदाळे यांनी दिला. आंदोलनात एस.यू. म्हसकर, पुंडलिक रहाटे, अरुण मराठे, रवींद्र तम्मेवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.