नागपूर : देशात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू होऊन दशक उलटले; परंतु त्यामधील ‘शिक्षकांना अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्ती’ देण्याबाबतच्या तरतुदीची अंमलबजावणी मात्र अजूनही होताना दिसत नाही. विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या गळ्याभोवती दिवसेंदिवस नवनव्या अशैक्षणिक कामांचा गळफास अधिकाधिक आवळला जात असल्याचे दिसून येते. अशैक्षणिक कामांची व्याप्ती बघितली तर शिक्षकांची नियुक्ती विद्यार्थ्यांसाठी झाली की अशैक्षणिक कामे करण्यासाठी झाली, असा प्रश्न पडतो..!
अशैक्षणिक कामे करताना शिक्षकांना निभावावी लागणारी ‘बहुरूपी’ भूमिका बघितली तर शासनाने शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्यापासून परावृत्त करण्याचा विडाच उचलला आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व बाबींचा विपरीत परिणाम शाळांची पटसंख्या कमी होण्यावर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतो आहे.
मुख्याध्यापक म्हणजे फिरता शिक्षक
जिल्हा परिषदअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शाळा या द्विशिक्षकी आहेत. त्यांपैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार असतो. मुख्याध्यापक म्हणून माहितीचे संकलन करणे, अहवाल देणे, सभेला जाणे या व अन्य प्रशासकीय कामाकरिता कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. खऱ्या अर्थाने तो फिरता शिक्षकच असतो. जिल्ह्यात केवळ ८५ शाळेत स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर आहे. इतर ठिकाणी सहायक शिक्षकांनाच आपले वर्गअध्यापन करून हा कार्यभार सांभाळावा लागतो. मुख्याध्यापकांच्या दप्तरात जवळपास ३५ पेक्षा अधिक अभिलेख आहेत. जे या शिक्षकांना पूर्ण करावे लागतात, वेळोवेळी नोंदी घ्याव्या लागतात.
- शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे
१) मतदार नोंदणी पुनर्निरीक्षण
२) शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ, दक्षता समिती, शालेय पोषण आहार समिती अशा समित्यांच्या सभा घेणे व इतिवृत्त लिहिणे.
३) वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन कार्यक्रम राबविणे
४) विविध शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरणे.
५) प्लास्टिकमुक्ती, तंबाखूमुक्ती अभियान
६) ग्रामस्वच्छता अभियान राबविणे
७) आरोग्य विभागाच्या विविध जनजागृती, सहभाग
८) शालेय प्रशासकीय दप्तर सांभाळणे
९ ) विद्यार्थी दाखल - खारीज संदर्भातील कार्यालयीन कामे
१०) माहितीची ऑनलाईन कामे
११) ग्रामसभा घेणे
१२) विविध शासकीय सर्वेक्षण करणे
अनेक शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक नसल्याने मुख्याध्यापक म्हणून सर्व प्रकारची कार्यालयीन कामे करणे.
१४) मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने केंद्रप्रमुख व शिक्षणविस्तार अधिकारी यांचे कार्यभार सांभाळणे.
१५) हागणदारीमुक्ती मोहिमेत काम करणे
१६) शौचालय व पाण्याची टाकी यांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी.
१७) दरवर्षी गाव सर्वेक्षण करणे
निवडणूक, जनगणना व आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये अशी स्पष्ट तरतुद शिक्षण हक्क कायद्यात आहे. तरीसुद्धा राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून करून घेतली जातात. काही अशैक्षणिक कामे करण्यासाठी प्रशासनाकडून दबावतंत्राचाही वापर केला जातो, ते थांबले पाहिजे.
लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर