नितीन गडकरी : कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपूल भूमिपूजन;
उमरेडवरून कोळसा आता दोन-तीन तासात नागपुरात पोहोचेल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर व मध्य नागपूरला जोडणाऱ्या कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपुलामुळे उत्तर व मध्य नागपुरातील वाहतूक काेंडी संपणार आहे. तसेच नागपूर ते उमरेड ब्रॉडगेजचे काम सुरू झाले आहे. ब्राडगेज मेट्रो सुरू झाल्यानंतर उमरेडपर्यंत ३० मिनिटांत आणि ४० मिनिटांत ब्रह्मपुरीला पोहोचणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ऑनलाइन या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच महापौर दयाशंकर तिवारी, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, महारेलचा व्यवस्थापकीय संचालक आर. के. जैस्वाल उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, हा उड्डाणपूल अशक्यच होता; पण महारेल यांनी चांगले डिझाइन तयार केल्यामुळे हा उड्डाणपूल होत आहे. यासाठी १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. भारत सरकार, ऊर्जा विभाग आणि पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने नागपूर-उमरेड ब्रॉडगेजचे काम होत आहे. नागपूर-उमरेड हा मार्ग चारपदरी केला आहे. उमरेड-भिवापूर हा रस्ता वनविभागातील अडचणीमुळे चारपदरी होऊ शकत नाही. राज्य शासनाकडून चारपदरीसाठी मंजुरी मिळाली तर आपण उमरेड-भिवापूर मार्ग चारपदरी करू,असेही गडकरी म्हणाले.
...
डिसेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करणार
कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपुलामुळे मोमीनपुराखाली असलेल्या रोडवरील वाहतूक कमी होईल. हा रस्ताही मोठा करणार आहे. मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलपर्यंतचा रस्ताही चारपदरी करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी २.८२ किमी असून या प्रकल्पासाठी १५० कोटी रुपये खर्च येणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे.
...
९० ठिकाणी भुयारी मार्ग
महारेलकडून संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याच्या हेतूने रेल्वे उड्डणपूल आणि भुयारी मार्गांची कामे ९० ठिकाणी सुरू आहेत. या ९० उड्डाणपुलांपैकी ३० उड्डाणपूल एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भातील जनतेला याचा फायदा होईल. प्रवास सुखकर आणि वेगवान होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
....
मुख्यमंत्र्यांनी केले गडकरी यांचे कौतुक
कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपूल भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. नितीन गडकरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. तसेच दिवसागणिक ते आपले कर्तृत्व सिध्द करीत आहेत, भाजप-शिवसेना युतीच्या काळात मुंबई ते पुणे हे अंतर दोन तासात पूर्ण करण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. ते पूर्ण करण्याचे धाडस नितीन गडकरी यांनी दाखविले व ते स्वप्न प्रत्यक्षात आणून दाखविले. ज्या गतीने तुम्ही काम करता त्यापेक्षा अधिक गतीने तुमची पुढची वाटचाल होवो, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी गडकरींचे कौतुक केले.