नरेश डोंगरे ।
नागपूर : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या पुष्पा या चित्रपटाचे कथानक चंदन तस्करीभोवती फिरत असले तरी नायकाच्या खलनायकी बाजाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. कधी कुऱ्हाड, कधी कोयता तर कधी बंदूक बाळगणारा चित्रपटाचा नायक पुष्पा राज (अल्लू अर्जुन) त्याच्या भरदार दाढीवर हात फिरवत ‘फ्लॉवर नहीं, फायर है मै...’ म्हणत समोरच्याला नेहमी ‘चमकवत’ असतो.
चित्रपट कोणताही असू दे, त्यातील वाईट, खास करून गुन्हेगारी फंड्यांचे अनुकरण करून ‘डायलॉग’बाजी करणारे जागोजागी आढळतात. नागपूर शहर आणि जिल्हाही त्याला अपवाद नाही. येथील गुन्हेगारीची या ना त्या कारणाने नेहमीच चर्चा होत असते. एकमेकांना आव्हान देणाऱ्या गुंडांची थोडी जरी माहिती मिळाली की पोलीस या गुंडांच्या मुसक्या आवळतात. त्याच्यावर कंबरतोड कारवाईदेखील करतात. तरीसुद्धा शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांची वळवळ थांबत नाही. पोलिसांकडून कडक कारवाई होत असली तरी गुंडांचा आविर्भाव ‘झुकेंगा नहीं...’ असाच असतो. पुष्पा सिनेमा आता प्रदर्शित झाला असला तरी नागपूर शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांना ‘पुष्पा फीव्हर’ कधीचाच चढल्याचे दिसून येते. ‘फ्लॉवर नहीं, फायर है मैं....’ अशा आविर्भावात ते बिनधास्त माऊझर, पिस्तूल घेऊन फिरताना आढळतात.
१० - २० हजारांत मिळते पिस्तूल
जिल्ह्यात सावनेर, कामठी, कन्हान भागात कोळसा खाणी आहेत. रेतीचे घाटही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोळसा, रेती तस्करीला १२ महिने उधाण असते. त्यातून गुन्हेगारी टोळ्यांची स्पर्धा अन् गुंडांची संख्याही तिकडे मोठी आहे. परप्रांतीयांची सारखी वर्दळ असल्याने त्या भागातील गुन्हेगारांकडे सर्रास माऊझर, पिस्तूल, कट्टे आणि काडतुसे आढळतात. १० ते २० हजारात त्यांना सहज देशी कट्टे विकत मिळतात.
गुन्हेगारांत पिस्तुलाचे फॅड
छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशातून हे कट्टे आणून इकडे विकले जातात. कमी किमतीत सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारामंध्ये अलीकडे पिस्तूल, माऊझर, देशी कट्टे बाळगण्याचे फॅडच आले आहे. ज्याच्याकडे पिस्तूल तो मोठा गुन्हेगार, असा गुन्हेगारांमधील समज आहे. त्यामुळे भाईगिरीचे भूत अंगात भिनलेले गुंड पिस्तूल, देशी कट्टे घेऊन फिरतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांतही ते पिस्तूल घेऊन जातात. वेळोवेळी होणाऱ्या पोलीस कारवाईतून ते उजेडातही येते.
२९ माऊझर, दोन भरमार बंदुका आणि ८५ काडतुसे
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ३२ तर गेल्या तीन महिन्यात पाच असे एकूण ३७ गुन्हे दाखल झाले आहेत. अवैध शस्त्र बाळगण्याच्या आरोपात तीन वर्षांत ५३ तर गेल्या तीन महिन्यात ८ असे एकूण ६१ आरोपी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून २९ माऊझर, दोन भरमार बंदुका आणि ८५ काडतुसे जप्त केले. गुंडांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या शस्त्र आणि काडतुसांची एकूण किंमत ६ लाख ९० हजार ३०० रुपये आहे. शहरातील कारवाईचा अधिकृत आकडा नाही मात्र कारवाईचे आणि शस्त्र जप्तीची संख्या दुप्पटपेक्षा अधिक असल्याचे अधिकारी सांगतात.