लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे बळी गेले. यातून धडा घेत दुसऱ्या लाटेची तयारी केली असती तर रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. हजारो लोकांचे बळी गेले नसते. यानंतरही महापालिका अर्थसंकल्पातआरोग्यासाठी ठोस अशी तरतूद केली नाही. आरोग्यासाठी अर्थसंकल्पाच्या दोन टक्केच तरतूद केल्याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच मनपात खळबळ उडाली. नगरसेकांनीही आक्रमक भूमिका घेतली. यावर बचावात्मक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता, शौचालय याचा निधी जोडून २५५ कोटींची तरतूद केल्याचा दावा सोमवारी मनपाच्या विशेष सभेत अर्थसंल्पावरील चर्चेदरम्यान केला. यावरून मनपात आकड्यांचा व निव्वळ शब्दांचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
घनकचरा व्यवस्थापनासाठी १०३.२८ कोटी, शौचालयासाठी ४ कोटी, महिला शौचालयासाठी २८ लाख यासह स्वच्छतेशी संबंधित खर्चाचा समावेश करून आरोग्यासाठी एकूण तरतूद २५५ कोटी आहे. यात दवाखाने व कोविड नियंत्रण खर्चाचा समावेश आहे. यातून मनपाची आरोग्य यंत्रणा सुधारणार नाही, अशी घणाघाती टीका विरोधकांनी तर विरोधकांचा आरोप चुकीचा असून मागील १४ वर्षांच्या कालावधीत शहराचा विकास झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.