लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रमाणाबाहेर गोड खाणे हे शरीरासाठी अपायकारक आहे. मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांना घेऊनही अनेकांनी साखरेवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे. परंतु गोड पदार्थ समोर येताच स्वत:ला रोखू न शकणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे, गोड पदार्थ खाण्यामध्ये मुलांपेक्षा मोठेच जास्त असल्याचे व यात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन (एनआयएन) हैद्राबाद यांनी देशातील सात प्रमुख मेट्रो शहरांमध्ये गोड पदार्थ खाण्यावर सर्वेक्षण केले. या सर्व शहरांमध्ये सरासरी १९.७ ग्रॅम दररोज साखरेचे सेवन केले जात असल्याचे समोर आले. ‘आयसीएमआर’ने निश्चित केलेल्या ३० ग्रॅम या मानकापेक्षा हे प्रमाण खूप कमी असल्याने भारतीय नियंत्रणात साखर खात असल्याचेही यातून समोर आले आहे. शाळेत जाणारे एक मुल दररोज सरासरी १७.६ ग्रॅम साखरेचे सेवन करतो.१० ते १८ वयोगटातील मुले सरासरी १९.९ ग्रॅम, १९ ते ३५ वयोगटातील तरुण १९.४ ग्रॅम, ३६ ते ५९ वयोगटातील लोक २०.५ ग्रॅम तर ६० वर्षांवरील व्यक्ती २०.३ ग्रॅम साखरेचे सेवन करत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.सर्वात कमी साखरेचे सेवन हैदराबादेतील लोक करतातसर्वेक्षणानुसार पुरुष रोज सरासरी १८.७ ग्रॅम तर स्त्रिया २०.२ ग्रॅम साखर खातात. इतर सात शहराच्या तुलनेत हैदराबाद येथील लोक सर्वात कमी साखर खातात तर मुंबईतील लोक सर्वाधिक गोड खातात. मुंबई येथील येथील एक व्यक्ती रोज सरासरी २६.३ ग्रॅम साखरेचे सेवन करते. हेच प्रमाण हैदराबाद येथे १५.५ ग्रॅम आहे. इतर शहरांमध्ये अहमदाबाद २५.९ ग्रॅम, दिल्ली २३.२ ग्रॅम, बेंगळुरू १९.३ ग्रॅम कोलकाता १७.१ ग्रॅम, चेन्नई येथे १६.१ ग्रॅम एवढे आहे.
मुले नव्हे मोठेच खातात जास्त गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:49 AM
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन (एनआयएन) हैद्राबाद यांनी देशातील सात प्रमुख मेट्रो शहरांमध्ये गोड पदार्थ खाण्यावर सर्वेक्षण केले.
ठळक मुद्दे भारतीय खातात नियंत्रणात साखर ‘आयसीएमआर’ व ‘एनआयएन’चे सर्वेक्षण