लोकमत न्यूज नेटवर्क
मिदनापूर : पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये प्रचाराचा पारा तापत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी भाजप नेत्यांची तुलना चक्क दुर्योधन, दुःशासन व मीर जाफरसोबत केली. भाजप नेत्यांची राज्यातून घालविण्याची वेळ आली आहे. राज्याला पंतप्रधान मोदींचा चेहरादेखील पाहायचा नाही. इतकेच काय बंगालमध्ये लुटारू, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफरदेखील नको असे म्हणत भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. पूर्व मिदनापूर येथे आयोजित प्रचार सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
भाजपने तृणमूलमधून आलेल्या नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. मात्र, यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते व नेते दुखावले गेले आहेत. ते घरी बसून आता अश्रू ढाळत आहेत. भाजपच्या लोकांनी अगोदर माझ्या डोक्यावर प्रहार केला होता. आता पायावर हल्ला केला. मात्र, मी ‘स्ट्रीट फायटर’ असून, जनतेसाठी संघर्ष सुरू राहील, असे त्या म्हणाल्या.
ममता यांच्या ‘खेल होबे’ला पंतप्रधांनांनी ‘विकास होबे’ने प्रत्युत्तर दिले होते. यावर बोलताना ममता यांनी मोदी यांना चक्क ‘कॉपीकॅट’ असे संबोधले. मोदी ‘टेलिप्रॉम्प्टर’ वापरतात आणि बांगला भाषेत बोलतात. ‘परिवर्तन’ हे माझे घोषवाक्य होते. मोदींनी त्याचीदेखील कॉपी का केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अधिकारींवर विश्वास ही चूकच
यावेळी एकेकाळचे सहकारी व भाजपचे उमेदवार शुवेंदु अधिकारी यांच्यावरदेखील ममता यांनी टीका केली. मी त्यांच्यावर आंधळा विश्वास टाकला होता व त्यांनी माझा विश्वासघात केला. अधिकारीसह काही जण २०१४ पासूनच भाजपच्या संपर्कात होते, असा दावा त्यांनी केला.