नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याची कामगिरी सुधारली असली तर ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यात यश आलेले नाही. यंदाच्या आर्थिक वर्षातील सुरुवातीच्या ११ महिन्यांत ५१२ कोटींचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट असताना विभागाला ४८५ कोटींचाच आकडा गाठता आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे विचारणा केली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात गोळा झालेला महसूल तसेच संबंधित बाबींसंदर्भात माहिती विचारण्यात आली होती. राज्य माहिती आयोगाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे माहिती देण्यात आली.एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत उत्पादन शुल्क खात्याने ५१२ कोटी ७२ लाख रुपयांच्या महसूलाचे उद्दीष्ट ठेवले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४८५ कोटी १३ लाख ३२ हजार ९५५ रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. म्हणजेच २७ कोटी ५८ लाख ६७ हजार ४५ रुपयांचा फरक पडला आहे. वर्षभरातील सर्वाधिक महसूल हा मार्च महिन्यात जमा होतो. त्यामुळे ही फरकाची आकडेवारी बदलण्याची शक्यता आहे. वर्षभराचे उद्दिष्ट ६३१ कोटी ५ लाख रुपयांचे आहे.मागील वर्षीपेक्षा कामगिरीत सुधारणा२०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात यंदा राज्य उत्पादनशुल्क खात्याची कामगिरी सुधारली आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांत खात्यातर्फे ४८५ कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५.१३ टक्के इतकी आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार फेब्रवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण ४८५ कोटी १३ लाख ३२ हजार ९५५ रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. मागील वर्षी हाच आकडा ४२१ कोटी ३७ लाख ३७ हजार ९५३ इतका होता. म्हणजेच यंदा ६३ कोटी ७५ लाख ९५ हजार रुपयांचा अधिक महसूल गोळा करण्यात विभागाल यश आले आहे.(प्रतिनिधी)
उत्पादन शुल्क खात्याची उद्दिष्टपूर्ती नाहीच
By admin | Published: March 30, 2015 2:36 AM