अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार : लोकमाता पुरस्कार वितरण समारंभ नागपूर : आपले कुटुंब आणि आपण स्वत: इतके मर्यादित जग होत असताना आपले काही समाजऋणही आहे, हे लोक विसरत चालले आहे. समाजासाठी पैसा खर्च करणारे अनेक दानशूर, श्रीमंत आहेत. पैसा पुन्हा कमाविता येतो पण ज्यांनी सेवेसाठी आयुष्य खर्च केले ते परत मिळविता येत नाही. हा देश अशा सेवाव्रतींची किंमत करणारा देश आहे. समाजासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या व्यक्तींचाच नव्हे तर मानवी संवेदना आणि प्रामाणिकपणाचाच हा सत्कार आहे, असे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी व्यक्त केले. लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानतर्फे सायंटिफिक सभागृहात लोकमाता पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती आणि राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख प्रमिलाताई मेढे, माजी महापौर कुंदाताई विजयकर, छायाताई गाडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, ज्योत्स्ना पंडित, देवेन्द्र दस्तुरे आणि प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष प्रवीण गादेवार उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, या सेवाभावींना दीर्घ आरोग्य लाभावे. आपला देश सेवेचा सन्मान आणि शौर्याची आरती करणारा आहे. त्यामुळेच नादिर शाह आणि चंगेज खान आपले आदर्श नाहीत तर शिवाजी महाराज आणि झाशीची राणी आपले आदर्श आहेत. लोकमाता सुमतीताईंच्या नावाने दिला जाणारा हा सेवा आणि शौर्य पुरस्कार देताना समाधान वाटते. सुमतीताईंनी आमच्या पक्षाचे काम केले पण पक्ष केवळ सेवेचे आयुध म्हणूनच त्यांनी वापरले. नितीन गडकरींनाही त्यांचा आशीर्वाद लाभला. त्यांच्यातील आई आम्ही अनुभवली आहे. समाजाचे ऋण आपण फेडलेच पाहिजे, हा संस्कार त्यांनी केवळ आमच्यावरच नाही तर इतर पक्षांतील नेत्यांवरही केला. त्यांच्या नावाचा हा पुरस्क ार प्रदान करताना त्यामुळेच आनंद वाटतो. कार्यक्रमात प्रमिलाताई मेढे यांचा सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना लोकमाता सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या संज्ञा संवर्धन संस्थेला लोकमाता सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. ओम व सोहम कठाळे यांनी जलतरण तलावात बुडणाऱ्या एका चिमुकलीला वाचविल्याबद्दल त्यांना लोकमाता शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सोनसाखळी ओढून पळणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांत देणाऱ्या सुफिया हिदायत खान यांनाही शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, लोकमाता हे विशेषण महत्त्वाचे आहे. सुमतीताईंच्या ऋणातून उतराई होण्याचाच हा प्रयत्न आहे. आपल्या समाजातील आई हरवतेय का, असा प्रश्न पडतो पण सुमतीताईंची आठवण केल्यावर हीच आई आपल्यातही सापडते, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उदय बोधनकर यांनी तर आभार ज्योत्स्ना पंडित यांनी मानले. संचालन रुपाली कोंडेवार-मोरे यांनी केले. (प्रतिनिधी)पुरस्काराची रक्कम नागालँडच्या छात्रावासाला प्रमिलाताई मेढे नि:स्पृहपणे कार्य करणाऱ्या सेविका आहेत. राष्ट्रसेविका समितीचे काम करताना देशात आणि विदेशातही त्यांचे कार्य आहे. त्यांना या पुरस्कारापोटी मिळालेली रक्कम त्यांनी नागालँड येथे आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या राणीमा गाडेल्लु छात्रावासाला दान देण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी त्यांच्या या दातृत्वाला उपस्थितांनी दिली.
हा व्यक्तींचा नव्हे संवेदनांचाच सत्कार
By admin | Published: December 25, 2014 12:27 AM