निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाघांची राजधानी असलेल्या विदर्भात चित्ता का आणला नाही, असा प्रश्न विदर्भातील लाेकांना पडला आहे; कधीकाळी विदर्भ, महाराष्ट्रातही चित्त्यांचा अधिवास माेठ्या प्रमाणात हाेता. आज ती परिस्थिती नाही, असे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गाेपाल ठाेसर यांनी सांगितले, चित्त्यांसाठी पाेषक असलेल्या राज्यातील गवताळ प्रदेशावर अतिक्रमण झाले. त्यावर कारखाने उभे झाले. या प्रदेशातील जैवविविधता नष्ट झाली. विदर्भातही तीच स्थिती आहे. त्यामुळे चित्त्यांसाठी पाेषक गवताळ प्रदेश व खाद्य नसल्याने ताे विदर्भात टिकू शकत नाही.
दहा वर्षांचे प्रयत्न फळाला : डाॅ. गिरडकरवन्यजीव संशाेधक डाॅ. प्रज्ञा गिरडकर यांनी काहीकाळ नामिबियामध्ये राहून चित्त्यांच्या व्यवहारांवर अभ्यास केला आहे. त्यांनी सांगितले, २०१२ साली चित्ते भारतात आणण्याचा प्रस्ताव आला हाेता. मात्र प्रकरण न्यायालयात गेले. भारतात यापूर्वी चित्त्यांचा अधिवास हाेता. शिवाय भारतातील वातावरण जवळपास आफ्रिकेप्रमाणे आहे, ही बाब डाॅ. गिरडकर व इतर वैज्ञानिकांनी न्यायालयास पटवून दिली. वन्यजीव जेनेटिक्स तज्ज्ञ डाॅ. स्टिफन ओबराॅय यांनी ‘नामिबियाचे चित्ते भारतात राहू शकतील’, असे पत्र पाठविले हाेते. हेच पत्र डाॅ. गिरडकर यांनी न्यायालयात सादर केले आणि चित्ते आणण्याचा मार्ग माेकळा झाला.