- १६ जुलै १९४८ ते १६ जुलै २०२१ : रंगरसिल्या एफएमच्या दुनियेतही आकाशवाणीचा रेडियो ‘ओल्ड इज गोल्ड’
- ७४ वा वर्धापन दिन विशेष
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संस्था महत्त्वाची असते. तेथे काम करणारे कोण, हे नेहमी दुय्यम. तंत्रज्ञान कितीही बदलो, मीडिया कधीच लोप पावत नाही... हे म्हणणे आहे, आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन नाखले यांचे. त्यांच्या या कथनाला दुजोरा मिळतो, तो नागपूर आकाशवाणीच्या आर्काईव्हज अर्थात जुन्या आठवणींच्या स्मृतिगंधाला. स्मृतींच्या संग्रहाचा एवढा साठा क्वचितच कुणाकडे, कोण्या संस्थेकडे असेल. त्यामुळे, हे नुसते शासकीय स्थळ ठरत नाही तर लाखो मनांच्या प्रतिबिंबाचा वारसा ठरते.
आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाईन रेडिओ, रेडिओ ॲप आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे. ५८५ किलो हर्टझ तरंगवारंवारता असलेल्या या केंद्रावरून युवावाणी, विविध भारती, वृत्त विभाग, कृषी आदी विविध विभागाचे प्रसारण होत असते. आजही या केंद्रांवरून होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा गोडवा रसिक मनांमध्ये कायम आहे. आजही खेडोपाडी आणि शहरांत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे यांच्या निधनाचे थेट आवाजी प्रक्षेपण, लाईव्ह क्रिकेट समालोचन, अनेक घटनांचे वृत्तनिवेदन आणि त्यांचे कलेक्शन आजही आकाशवाणीकडे आर्काईव्हच्या स्वरूपात संग्रहित आहे.
-------------
पॉईंटर्स
प्रथम प्रसारण - १६ जुलै १९४८
पहिले गायक - क्रिष्णाराव
पहिले गाणे - वंदे मातरम्
पहिले भाषण - तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल
पहिला कार्यक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खंजेरी वादन व भजन, उस्ताद अल्लाउद्दीन खाँ साहेब, प्रसिद्ध गायिका शांता आपटे, पं. द्वारकाप्रसाद मिश्रा व कवि अनिल यांचे सादरीकरण
-------------
कस्तूरचंद डागा यांनी दिली इमारत
इंग्रजांनी स्थापन केलेल्या भारतीय राज्य प्रसारण मंडळाचे १९३६ साली ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले. स्वातंत्र्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ऑल इंडिया रेडिओचा स्वतंत्र विभाग झाला. नागपुरात आकाशवाणी केंद्राची पायाभरणी आजच्या केंद्राच्याच ठिकाणी झाली. कस्तूरचंद डागा यांच्या मालकीच्या डागा इमारतीतच हे केंद्र सुरू झाले. ही इमारत आजही ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षित आहे. याच इमारतीच्या शेजारी केंद्राच्या नव्या वास्तूतून वर्तमान कारभार चालतो.
----------------
किलोने यायचे दररोज पत्र
१९६६ साली नागपूर आकाशवाणीवरून मराठी भाषेतील बातम्यांचे प्रक्षेपण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे, वृत्तसंकलक म्हणून १९६७ मध्ये मी रुजू झालो. त्या काळात मर्फी कंपनीचा सेलवर चालणारा रेडिओ काही जणांकडे होता. क्रिकेटचे धावते समालोचन अतिशय लोकप्रिय होते. अनेक लोक आकाशवाणी केंद्राच्या भवताली गर्दीने उभे राहून हे समालोचन ऐकत असत. रेडिओ हे श्रवण माध्यम असल्याने कोण बोलतेय, हे कळत नव्हते. त्यामुळे, आवाजाचे प्रचंड फॅन फॉलोईंग असे. ‘माझं गाव माझं वावर’ या कार्यक्रमातील खंडूजी हे पात्र इतके प्रसिद्ध होते की त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. दररोज किलो-दोन किलो पत्र येत असत आणि त्यांची उत्तरे देणे कठीण होत होते. मात्र, उत्तरे देणे क्रमप्राप्त असे.
- प्रा. बबन नाखले, निवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी नागपूर केंद्र
----------------
आकाशवाणी हेच मनोरंजनाचे साधन
नागपूर आकाशवाणीने अनेक साहित्यिक, संगीतकार, गायक घडवले आणि त्यांना अमाप प्रसिद्धी दिली. आम्हीही त्याच लोकप्रियतेमुळे आकाशवाणीत काम करण्यास सज्ज असू. प्रसिद्ध कादंबरीकार शिवाजी सावंत यांची मुलाखत घेण्याचा योग मला बबन नाखले सरांनी दिला. त्यानंतर अनेकांच्या मुलाखती घेतल्या व नंतर माझीही मुलाखत आकाशवाणीवर प्रसारित झाली. आकाशवाणीच्या उद्घोषकांना तेव्हा प्रचंड वलय असे आणि त्यामुळे मलाही उद्घोषक व्हायची तीव्र इच्छा होती. ते कामही करता आले. आकाशवाणीशी जुळलो, याचा आनंद आहे.
- डॉ. प्रमोद मुनघाटे, समीक्षक व मराठी विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
..................