जितेंद्र ढवळे, नागपूर: वडिलांना मला इंजिनिअर करायचे होते. डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर आयएएस झालो! त्यामुळे बाजूचा काय करतो. आई-वडिलांना काय अपेक्षित आहे, त्यात न अडकता तुम्हाला काय आवडते हे महत्वाचे आहे. केवळ मेहनत नव्हे तर योग्य दिशेने मेहनत हेच यशाचे गमक आहे. तिला आत्मविश्वासाचे पंख लावून गरूडभरारी घ्या, अशी साद नागपूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना घातली. लोकमत युथ कनेक्ट, अमरावती येथील अनंत पंजाबराव देशमुख अकॅडमी आणि शिवाजी सायन्स कॉलेजच्या वतीने सोमवारी ‘युवा संवाद’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी डॉ. इटनकर यांनी शिवाजी सांयन्स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी खास वैदर्भीय शैलीतून संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, डॉ. अमोल महल्ले, अनंत पंजाबराव देशमुख अकॅडमीचे संचालक पकंज निर्मळ, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, शिवाजी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे याप्रसंगी उपस्थित होते.आज युवा भरकटलेला आहे, दिशाहीन आहे, असे सांगितले जात असले तरी तरूणाई काय करू शकते, हे नागपूर जिल्ह्यात ‘मिशन युवा’ अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीतून सिद्ध झाले आहे. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत १७ ते १९ वयोगटांतील १ लाखाहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली. याचमुळे नागपूर जिल्ह्याला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘बेस्ट इलेक्ट्रोरल’चा पुरस्कार देत गौरवान्वित करण्यात आल्याचे डॉ.इटनकर यांनी सांगितले. संचालन प्रा. डॉ. गजानन जाधव यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र ढोरे यांनी मानले.----बाजूच्यांना काय वाटते हे महत्त्वाचे नाहीच...आई-वडील काय म्हणतात किंवा बाजूच्यांना काय वाटते हे महत्त्वाचे नाही तर तुम्हाला नेमके कशात करिअर करायचे आहे. तुम्हाला कशात गती आहे, रस आहे, हे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. जगभरात भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. युवाशक्ती ही आपली ताकद आहे. ही ताकद आपण ओळखली पाहिजे. आई-वडिलांचा दबाव आणि शेजारचा कशात करिअर करणार आहे, यात न पडता तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा, असे डॉ. इटनकर म्हणाले.--सर, मलाही आयएएस व्हायचं आहे...बी.एस.स्सी.प्रथम वर्षांची विद्यार्थिनी अंजली मिश्रा हिने आयएएस होऊन देशसेवा करायची आहे. मात्र, आयएएस झाल्यावर कोणत्या आव्हानांना पुढे जावे लागते, असा प्रश्न विचारला तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले, केवळ आयएएस नव्हे तर डॉक्टर, इंजिनिअर, सैनिक तसेच प्रत्येक क्षेत्रात काम करणारा व्यक्ती देशाची सेवाच करतो. आयआयएस झाल्यावर अधिक संधी मिळते, हे खरे पण खुर्चीवर बसल्यावर परिस्थिती अनेक प्रश्नांची उत्तरे देते. अर्थात, खुर्चीवर बसण्यासाठी अधिक परिश्रमाची गरज असते. अंजलीने कार्यक्रमातच आयएएस होण्यासाठी डॉ. इटनकर यांना डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्याची विनंती केली. यावर त्यांनी आयएएस देव नसतो, तोही माणूस नसतो, असे सांगत शुभेच्छा दिल्या.---नशा करा पण ध्येय गाठण्यासाठी..आजची पिढी ‘जनरेशन झेड’ म्हणून ओळखल्या जाते. मोबाईल, सोशल मीडियाचा वापरही वाढला आहे. मात्र, हा वापर कशासाठी केला जातो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा हा वापर धोकादायक ठरू शकतो. आज मेट्रो शहरातील ३० ते ४० टक्के तरुण विविध व्यसनाच्या आहारी गेले आहे. नशा असावी पण ती सकारात्मक आणि कामाची, ध्येय गाठण्याची, असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.---‘स्टार्ट अप’मध्ये करिअरच्या अफाट संधीजिल्हाधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्हाला काय व्हायचे आहे, असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, युपीएससी, एमपीएससी करायचे आहे का, असे ऑप्शनही दिले. तसेच विदर्भातील विद्यार्थ्यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून करिअर करण्याचे आवाहन त्यांनी केले. नोकरीच्या मागे न धावता रोजगार देणारे व्हा, असे सांगत सरकारी पातळीवर यासाठी मोठी मदत होत असल्याचेही सांगितले.---करिअरचे स्वप्न सर्वच बघतात,पण मोटिव्हेशन कोण देणार?चांगल्या करिअरचे स्वप्न सर्वच बघातात. मात्र परिश्रम करण्याची तयारी कुणाचीही नसते. त्यामुळे मोटिव्हेशन कोण देणार, असा प्रश्न हर्षनीत कौर विद्धी या विद्यार्थीनीने जिल्हाधिकाऱ्यांना केला. यावर ते म्हणाले, दरवर्षी देशभरातून १० लाख विद्यार्थी युपीएससीची तयारी करतात. त्याचा अर्थ ते मोटिव्हेटेड आहेतच. सर्वच आयआयएस होतील, असे नाही तसेच स्टार्टअपचे आहे. स्टार्टअप सुरू करण्यातही आव्हाने आहेत. त्यासाठी प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे. आज स्टार्ट अपसाठी आयआयएम, नागपूर विद्यापीठात इनक्यूबेशन सेंटर आहेत. तिथे जावून तुम्ही तुुमची संकल्पना मांडू शकता व संबंधित तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही मिळवू शकता.------३० महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग‘लोकमत युथ कनेक्ट’ या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्याकडून यशाचा मंत्र ऐकण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेशी संलग्नित सुमारे ३० महाविद्यालयांचे अंदाजे दहा हजार विद्यार्थी Shivaji.live या यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी ते बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता.