योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षणाविरोधी भूमिका मांडून कोट्यवधी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. केवळ राहुलच नव्हे तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व माजी पंतप्रधान राजीव गांधी हेदेखील आरक्षणविरोधी होते. राहुल गांधी यांच्या राज्यातील प्रचार सभांमध्ये जाऊन भाजप त्यांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर जाब विचारेल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात बुधवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
राहुल गांधी यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. त्यांच्या पोटात होते ते ओठावर आले. काँग्रेसचा सुरुवातीलपासून आरक्षणाला विरोध आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटा प्रचार करत मोदी सरकारची बदनामी केली आहे. आता जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. ओबीसी समाजाचे नेते म्हणविणारे नाना पटोले हे राहुल गांधींच्य वक्तव्यावरून माफी मागणार आहे का असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात जिथे- जिथे सभा होतील त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा ओबीसी समाजासह अनुसूचित जाती जमाती समाजातील नागरिक त्यांचा निषेध करतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
डबल इंजिन सरकार हाच प्रचाराचा मुख्य मुद्दालोकसभेच्या आधी मोदी सरकारने देशासाठी काय योगदान दिले आहे ते आम्ही जनतेसमोर मांडले होते. पण त्यावेळी विरोधी पक्षा्ंच्या नेत्यांनी खोटा प्रचार करताना मतदारांना संभ्रमित केले. आरक्षणाला काँग्रेसचा विरोध हे आम्ही विधानसभा निवडणूकीअगोदर जनतेला पटवून देऊ. राज्यात सरकार आल्यास केंद्र व राज्य सरकार असलेले डबल इंजिन सरकार जोरदार काम करेल. याच मुद्द्यावर आमचा प्रचार राहणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
- गायकवाड, बोंडेंच्या वक्तव्याशी समहत नाही
खा.अनिल बोंडे तसेच आ.संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत व त्यांच्या वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही. मात्र राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याचे प्रकार बंद करावे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.कॉंग्रेसमध्ये सध्या आठ मुख्यमंत्री फिरत आहे तर उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत असले तरी शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करायचे आहे, असा चिमटा यावेळी त्यांनी काढला.