लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे केली. इंधन दरवाढ व महागाईविरोधात आयोजित आंदोलनात ते बोलत होते.
काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी गुरुवारी सायकल मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री अनिस अहमद, आ. अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, हुकूमचंद आमधरे, सुरेश भोयर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दुपारी १२ वाजता संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी आयोजित सभेत नेत्यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली.
- पावसामुळे मांडव कोसळला
संविधान चौक येथून हा सायकल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी सकाळपासूनच पाऊस होता. सकाळी ११ वाजेपासून कार्यकर्ते जमू लागले. छोटेखानी सभेसाठी मांडव टाकण्यात आले होते. पाऊस हळूहळू वाढत होता. मुख्य नेत्यांचे भाषण संपले आणि सायकल मोर्चा निघाला तसाच मांडवाचा एक भाग कोसळला. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली.