नागपूर : खा. कृपाल तुमाने व शिंदे गटाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांनी शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करीत असल्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोरांची आहे, असे जाहीर करा, असा सल्ला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे यांनी दिला आहे.
सर्व शिवसैनिक एकजूट आहेत. आठ वर्षांपासून असलेल्या खासदारांसोबत कुणीच नाही, असा दावा करीत भविष्यात तेदेखील माजी खासदार होतील, असा चिमटाही हरणे यांनी काढला आहे.
हरणे म्हणाले, तुमाने यांनी आमच्याकडे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, बूथप्रमुखपर्यंत बांधणी असल्याचे जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात एक उपजिल्हाप्रमुख, एक तालुकाप्रमुख व एक विधानसभा संघटक असे तीन पदाधिकारी जाहीर केले. तेही कार्यकर्ते किरण पांडव यांच्यासोबत गेलेले आहेत. ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे. अशा कार्यकारिणीने शिवसेनेची कोणतीही हानी होणार नाही. जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक एकजुटीने आहे. खा. तुमाने हे बूथप्रमुखपर्यंत बांधणी करण्याच्या बाता मारीत आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील एकही शिवसैनिक त्यांच्या सोबत नाही. नवरात्रीमध्ये मोठा बॉम्ब फोडण्याची पोकळ घोषणा त्यांनी केली. पण खरा बॉम्ब २०२४ मध्ये फुटणार असून, त्यांची खासदारकी संपुष्टात येणार आहे. त्यांना तिकीटदेखील मिळेल की नाही याचीच शंका असून, त्यांचाच राजकीय अंत झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावाही हरणे यांनी केला आहे.