नागपूर : युती-आघाडी तुटल्याने सर्वच मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी उसळल्याने मतदारांना उमेदवार निवडण्यासाठी अनेक पर्याय होते. तरीही जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात अनेकांनी नकारात्मक मतदानाचा (नोटा) पर्याय निवडला. नागपूर जिल्ह्यात तब्बल १५,७८७ लोकांनी एकही उमेदवार पसंत नसल्याचे स्पष्ट करीत ‘नोटा’ला पसंती दिली. कामठीत सर्वाधिक २९६२ लोकांनी नोटाला पसंती दर्शविली. निवडणुकीमध्ये नकारात्मक मतदानाचा अधिकार मिळावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करीत गेल्या निवडणुकीपासून मतदारांसाठी ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आपल्याला पसंत नाही, हे दर्शविण्यासाठी नोटाचा पर्याय निवडता येतो. यंदा युती-आघाडी तुटल्याने मतदारसंघात उमेदवारांची चांगलीच गर्दी होती. त्यामुळे उमेदवारांबाबत मतदारांजवळ अनेक पर्याय होते, अशा परिस्थितीतही नागपूर जिल्ह्यात १५ हजारावर लोकांनी नोटाला पसंती दिली. नागपूर जिल्ह्यात कामठी विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक म्हणजे २९६२ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. त्यानंतर सावनेरमध्ये २६८१ जणांनी, रामटेकमध्ये १३७९, उमरेडमध्ये १३५२, हिंगण्यात ७०९, काटोलमध्ये ५५० जणांनी ‘नोटा’चा वापर केला. नागपूर शहराचा विचार केला असता दक्षिण नागपूर मतदारसंघात सर्वाधिक १२७६ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. त्यानंतर पश्चिम नागपूरमध्ये ११४३, दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात १०१४, पूर्व नागपूरमध्ये १०५७, मध्य नागपूरमध्ये ९३० आणि उत्तर नागपूरमध्ये ७३४ जणांनी नोटाचा पर्याय निवडला. विदर्भाच्या मुद्यावर काही संघटनांनी मतदारांना ‘नोटा’ची बटन दाबण्याचे आवाहन केले होते. काही मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार नव्हते तेथेही अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
‘नोटा’ला नाही तोटा !
By admin | Published: October 25, 2014 2:42 AM