लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या २५०० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची उत्तरे येत आहेत. आतापर्यंत जवळपास आलेल्या उत्तरांपैकी ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहण्याबाबत दिलेली उत्तरे संयुक्तिक असल्याचे दिसून आले. त्यांना निवडणुकीच्या कामातून सूट देता येऊ शकेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.निवडणुकीसंदर्भात विविध विभागातील कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु काही कर्मचारी निवडणुकीच्या कामातून अंग काढून घेत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांनी आपल्याला निवडणुकीच्या कामातून वगळण्याबाबत विनंतीही केली आहे. दरम्यान कर्मचारी प्रशिक्षणाला दांडी मारत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रशिक्षणाला कर्मचारी मोठ्या संख्येने हजर आहेत. २० टक्के कर्मचारी अनुपस्थित आहे. अशा अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी दिलेली कारणे ही संयुक्तिक आहेत. त्यांना कामातून सूट देता येऊ शकते. परंतु जाणीवपूर्वक गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.