नागपूर : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार ॲड. किरण सरनाईक यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी सरनाईक यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
सरनाईक यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात आतापर्यंत दोन निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. एक याचिका अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांची आहे. त्या याचिकेत सरनाईक यांना गेल्या २५ जानेवारी रोजी नोटीस जारी झाली आहे. सरनाईक यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या, पैसे व इतर भेटवस्तू वितरित केल्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय त्यांनी नामनिर्देशनपत्रासाेबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ही कृती भ्रष्ट व्यवहारामध्ये मोडते. त्यामुळे सरनाईक यांची निवड अवैध ठरवून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे देशपांडे यांचे म्हणणे आहे. देशपांडे यांच्यातर्फे ॲड. अजय घारे तर, सरनाईक यांच्यातर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर व ॲड. प्रवीण देशमुख यांनी कामकाज पाहिले.