सुमेध वाघमारे/दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘चतुर्थ श्रेणी कर्मचारीच वाटतो औषध’ या शीर्षकांतर्गत ‘लोकमत’ने महापालिकेच्या गरोबा मैदान जुना बगडगंज येथील चकोले दवाखान्यात रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेल्या प्रकाराबाबत वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले. महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन सोमवारी रुग्णालयातील संबंधित डॉक्टर, फार्मासिस्ट आणि कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर गरोबा मैदान जुना बगडगंज येथील सखाराम चकोले दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना पडला होता. दवाखान्यात ‘लोकमत’च्या चमूने ‘स्टिंग ऑपरेशन’ केले असता धक्कादायक बाब नजरेस पडली होती. येथे सफाईच्या कामाची जबाबदारी असलेला कर्मचारी रुग्णांना औषध देण्याचे काम करीत होता, तर फार्मासिस्ट औषधे रुग्णांना देण्याचे सोडून रुग्णांकडून नोंदणी शुल्क आकारत होते. हा गंभीर प्रकार आढळल्यामुळे ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून या दवाखान्यातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता. वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले. दिवसभर महापालिका वर्तुळात चकोले दवाखान्यातील या गैरप्रकाराबाबत चर्चा झाली. अखेर या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी चकोले दवाखान्यातील डॉक्टर मंजू वैद्य, फार्मासिस्ट आणि सफाई कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईनंतर चकोले रुग्णालयात जाणाºया रुग्णांवर व्यवस्थित उपचार होणार आहेत.
डॉक्टरने वापरला स्टेथास्कोप‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये चकोले रुग्णालयातील डॉ. मंजू वैद्य या रुग्णांना हात न लावता तसेच स्टेथास्कोप न वापरताच औषधे लिहून देत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकताच सोमवारी डॉ. मंजू वैद्य रुग्णांना बसवून त्यांना काय झाले, याची विचारणा करीत होत्या तसेच स्टेथास्कोप लावून त्या रुग्णांची तपासणी करताना दिसल्या. रुग्णालयातील फार्मासिस्ट रुग्णांची नोंदणी सोडून औषधी वितरण करताना दिसले.