नागपूर : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेला निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याने जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सोनेगाव पोलीस व उत्तर प्रदेश एटीएस यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणावर आता १८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
निशांत हा ब्रह्मोस एअरोस्पेसच्या नागपूर शाखेत अभियंता होता. तेथील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने ८ आॅक्टोबर २०१८ रोजी नागपूर येथून अटक केली होती. त्यानंतर निशांतच्या संगणकात गोपनीय माहिती आढळून आली होती. तो एका महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यातून तो त्या महिलेला गोपनीय माहिती पुरवीत होता. ती माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचत होती.
नागपूरजवळच्या मोहगाव येथे डीआरडीओचा ब्रह्मोस मिसाईल प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारत व रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. निशांत अटक होण्यापूर्वी चार वर्षांपासून या प्रकल्पात कार्यरत होता. त्याच्या हालचाली पाहून संशय बळावल्यानंतर एटीएसने कारवाई केली होती. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे निशांतने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.