लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिल थकीत असलेल्यांची वीज जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यासंदर्भात कारवाईला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ज्यांनी वीजबिल भरले नाही, अशा ग्राहकांना नोटीस पाठवून १५ दिवसांत बिल भरण्यास सांगण्यात येईल. यानंतरही बिल न भरल्यास वीज जोडणी कापण्यात येईल. या अनुषंगाने बुधवारी मोठ्या प्रमाणात वीज थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज जोडणी कापण्यास बंदी होती. महावितरणने बुधवारी ही बंदी मागे घेतली. परंतु, याची तयारी मात्र गेल्या शुक्रवारपासूनच सुरु झाली होती. २० केडब्ल्यूपेक्षा अधिक भार असलेल्या ग्राहकांना नोटीस पाठवली जात होती. याअंतर्गत १५ दिवसांची सवलत देत जोडणी कापण्याचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी नोटीस पाठविण्याला अधिक गती मिळाली. कंपनीचे म्हणणे आहे की, मोठ्या ग्राहकांनाच लिखीत नोटीस दिली जाईल. घरगुती ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस पाठविण्यात येतील. एसएमएस मिळाल्यापासून १५ दिवसांत ग्राहकांना थकीत बिल भरावे लागेल. तसे न केल्यास त्यांची वीज जोडणी कापली जाईल. औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसह घरगुती ग्राहकांविरोधातही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करत आहेत. दुसरीकडे बहुतांश थकबाकीदारांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने वीजबिलात सवलत देण्याच्या आश्वासनामुळेच त्यांनी बिल भरले नाही. आता थकबाकी प्रचंड वाढली आहे आणि अशा परिस्थितीत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
बॉक्स
३,०२,६२७ घरगुती ग्राहकांवर २४७.३५ कोटींची थकबाकी
नागपूर शहरातील ३,०२,६२७ घरगुती ग्राहकांचे तब्बल २४७.३५ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. अशा परिस्थितीत या ग्राहकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या सर्व ग्राहकांना ‘एसएमएस’वर नोटीस पाठविण्यात येईल. त्याचप्रकारे ४४,२६५ वाणिज्यिक ग्राहकांचे ४९.७९ कोटी व ४,४९२ औद्योगिक ग्राहकांचे २८.०५ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे.