लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोकुल खदानमधील कामगार महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी गोकुल खदानचे व्यवस्थापक जी.एस. राव यांच्यासह सात जणांना वेगवेगळ्या कारणांचा खुलासा मागत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी चार जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कारणे दाखवा नोटीसचे स्पष्टीकरण आल्यानंतरच संबंधित जर यात दोषी असल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे वेकोलि उमरेडचे विभागीय महाव्यवस्थापक एम.के. मजुमदार यांनी स्पष्ट केले. नोटीस बजावण्यात आलेल्यात सुरक्षा विभागाचे प्रमुख महेश मेंढे, याच विभागातील सुरक्षा रक्षक गंगाधर भुते, गजानन झोडे, वेलफेअर विभागाच्या सुधा शेंडे, सिव्हिल इंजिनिअर श्रीकांत भगडीकर, संजय जॉन यांचा समावेश आहे.सोबतच उमरेडच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या मंजूषा नायर, एरिया पर्सनल मॅनेजर हीरक सरकार, सिव्हिल इंजिनिअर राजू निकोसे, कार्मिक प्रबंधक अनिल डहाट यांच्यावही कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल व्यक्त होत असून याप्रकरणी काहींना बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.