नागपूर : रामबाग, इंदिरानगर, जाटतरोडी, सरस्वतीनगर, तकिया परिसरातील झोपडपट्टीवासीयांना रेल्वेतर्फे नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. हे नागरिक ५० वर्षांपासून संबंधित जागी राहत आहेत. शिवाय, त्यांना नागपूर महापालिकेकडून मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत व ती जागा नासुप्रची असल्याने रेल्वेने दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात याव्या, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांची भेट घेतली.
या झोपडपट्ट्यांमध्ये १६०० कुटुंबे राहतात. १०० वर्षांपूर्वी एम्प्रेस मिलकडे जाणारी रेल्वेलाइन टाकण्यात आली होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर त्या लाइनचा काहीच उपयोग झालेला नाही. नागपूर मनपाने त्यांना मालकी हक्काचे पट्टेदेखील दिले व नियमितपणे त्यांच्याकडून कर घेण्यात येत आहे. वीजमंडळानेदेखील वीजजोडण्या दिल्या आहेत, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.
पट्टेवाटप झाले असेल तर सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. आम्ही त्यांना विस्थापित करणार नाही, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी या भागातील नागरिकांशी फडणवीस यांनी संवाद साधला. गरज पडली तर याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयापर्यंत हा मुद्दा मांडू, असे फडणवीस म्हणाले.